पोलीस चौकी बाहेर सराईत गुन्हेगारावर गोळीबार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पोलीस चौकी बाहेर सराईत गुन्हेगारावर गोळीबार !


मालेगाव स्टॅन्ड परिसर बनला गुन्हेगारांचा अड्डा ; गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान !

नाशिक : नाशिकरोड परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पंचवटी परिसरात पोलीस चौकीजवळ एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा गोळीबार झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांच्यांशी संपर्क केला असता असता त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गोळीबाराची गंभीर घटना समोर आली आहे. पोलीस चौकीबाहेर गोळीबार केल्याने गुन्हेगारांनी थेट पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. 

             याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. ९ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मालेगाव स्टॅन्ड येथील हनुमान मंदिरासमोर संशयित भूषण लोंढे, प्रिन्स चित्रसेन सिंग आणि त्यांचे तीन अज्ञात साथींदारानी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ मध्ये आले होते. यावेळी भूषण लोंढे याने आपल्या जवळील पिस्टल काढून त्यातून दोन राउंड गोळीबार एका सराईत गुन्हेगारावर केले होते. मात्र, या गोळीबारातून संशयित बचावल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढत आपला जीव वाचविला असल्याची माहिती समोर येत आहे. या संशयितांनी गोळीबार केल्यानंतर पिस्टलमधून उडालेल्या दोन पुंगळ्या घेऊन घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे देखील समोर येत आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार मालेगाव स्टॅन्ड पोलीस चौकीच्या बाहेर झाल्याने पोलिसांना गुन्हेगारांनी एकप्रकारे खुले आव्हान दिले आहे. 
            गेल्या काही दिवसांपासून मालेगाव स्टॅन्ड परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे दिसत आहे. या परिसरात अनेक अवैध धंदे वाढल्याने या परिसरात दिवसरात्र गुन्हेगारांचा राबता वाढला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गावगुंड पोलीस चौकीबाहेर वाढदिवस साजरे करीत एकप्रकारे आपले शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे. अशा गावगुंडांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलीस चौक्या फक्त नावालाच उरल्या असून, पोलीस चौकीतील अधिकारी आणि कर्मचारी कोणाची चाकरी करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 
या गोळीबाराच्या घटनेबाबत बुधवार दि. ९ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे काहीही घडले नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गोळीबार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने खळबळ उडाली होती. या गोळीबाराच्या घटनेने जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शनिवार दि. १२ रोजी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरु केला आहे. 

Translate »
error: Content is protected !!