बंद फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ !
महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज !
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगर येथे एका फ्लॅटमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेने घराचे कुलूप उघडले असता ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव गेट पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्नालयात पाठवला आहे. घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याने महिलेचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
निशा मयूर नागरे, ३५, रा. कृष्णा प्राईड, सदाशिव नगर, पाथर्डी शिवार असे मृत महिलेचे नाव असून, त्या या फ्लॅटमध्ये गेल्या एक वर्षांपासून भाडेतत्वावर राहत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा नागरे यांच्या घरी काम करणारी मोलकरीण संगीता खिल्लारे या नेहमीप्रमाणे गुरुवार दि. २९ रोजी काम करण्यासाठी आली असता तिला फ्लॅटच्या दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले. यावेळी तिने आपल्याजवळील चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करताच तिच्या पायाखालची वाळू घसरली. घरात समोर तिची मालकीण निशा ही मृतावस्थेत आढळून आली. मोलकरणीने आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली. यावेळी खुनाची घटना नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कळवली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
आदल्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. २८ रोजी निशा नागरे यांनी पतीसोबत जेवायला बाहेर जायचे असल्याची माहिती मोलकरणीने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. तसेच, शव विच्छेदना नंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





