सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरणारे दोघे चोरटे गजाआड  - CHECKMATE NEWS
क्राईम

सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरणारे दोघे चोरटे गजाआड 


पंचवटी पोलिसांनी सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत 
प्रतिनिधी :  नाशिक

सीसीटीव्ही रिपेअर करण्याचा बहाणा करून थेट इमारतीमध्ये प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर चोरणाऱ्या दोघा आरोपीना पंचवटी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या चोरट्यांकडून पंचवटी पोलिसांनी जवळपास ५ लाख २० हजार रुपयांचे २० डीव्हीआर आणि १ लाख १५ हजारांची एक दुचाकी असा एकूण ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार करीत आहे. पोलिसांनी ज्या ज्या सोसायटीमधील डीव्हीआर चोरीला गेले असेल त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. 
 
पंचवटी परिसरातील हनुमानवाडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथील एकदंत हाईटस येथून १५ जून रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात दोघा चोरटयांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा शोध सुरु केला होता. दरम्यान पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना माहिती मिळाली की, दोन संशयित आरोपी हे डीव्हीआर विक्री करण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी हनुमानवाडी ते चोपडा लॉन्स रस्त्यावर सापळा रचून एम. एच. १५ के. एल. ९८८२ या दुचाकीवरील संशयित आरोपी समीर अय्युब शहा, २५, रा. मेहबूब नगर, वडाळा गांव आणि आसीम नूर खान, २३, रा. मेहबूब नगर, वडाळा गांव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० डीव्हीआर जप्त केले आहे. 
 
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहीकर, अमोल देशमुख,अंकुश काळे, नितीन पवार, गणेश आगोणे, योगेश वाईकंडे, विनोद चितळकर, संतोष पाटील, विलास चारोस्कर, नितीन जगताप, महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर, जयस्वाल यांनी केली आहे. 
 
आरोपी समीर आणि आसीम हे इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करायचे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर बसवविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे सोसायटीमधील डीव्हीआर कुठे ठेवलेला असतो. हे त्यांना चांगलेच ठेवून होते. तसेच, सोसायटीमध्ये प्रवेश करताना कोणी हटकले तर त्यांना सीसीटीव्हीचे काम करायला आले आहोत हे सांगितल्यास त्यांना सहजासहजी प्रवेश मिळून जात असल्याने ती डीव्हीआरची चोरी दिवसाढवळ्या करीत असल्याची आणि हे डीव्हीआर एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला विकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Translate »
error: Content is protected !!