पंचवटी परिसरात दिवसा येणार तरी लुटले जाणार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पंचवटी परिसरात दिवसा येणार तरी लुटले जाणार !


नाशिक : पंचवटीतील गोदा घाटावर भरणाऱ्या आठवडे बाजारात भर दुपारी एका युवकाला लुटण्यात आले. या युवकाने संशयितांचा पाठलाग कण्याचा प्रयत्न करताच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लुटमारीच्या घटनेमुळे पंचवटी परिसरात नागरिक दिवसादेखील सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंचवटी परिसराची वाटचाल बिहारच्या दिशेने होत तर नाही ना असा प्रश्न सामान्य पंचवटीकरांना पडला. 

            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रमोद बाबुराव कोल्हे, रा. एकता नगर, बोरगड यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार बुधवार दि. १६ रोजी प्रमोद कोल्हे हे आठवडे बाजारात दुपारी तीन वाजेच्या सुमारास बांबूच्या कामट्यांची टोपली घेण्यासाठी आले होते. टोपली घेऊन कोल्हे हे आपल्या दुचाकीवर बसत असताना अचानक एका संशयिताने त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेत पळ काढला. यावेळी कोल्हे यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताच दुसऱ्या एका संशयिताने पाठीमागून त्यांच्या मानेवर आणि कानावर लोखंडी रॉडने मारहाण करीत गंभीर जखमी केले. यावेळी पळून गेलेला संशयित पुन्हा घटनास्थळी आला आणि पुन्हा त्या अज्ञात दोघा संशयितांनी प्रमोद कोल्हे यांना लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल घेऊन पसार झाले. 

          याबाबत घाबरलेल्या प्रमोद कोल्हे यांनी कसेबसे पंचवटी पोलीस ठाणे गाठत झालेली हकीगत कथन करीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, भरदिवसा आठवडे बाजारात गुन्हेगारांनी सामान्य नागरिकांना लुटण्यास सुरुवात केल्याने परिसरात कायद्याचे आणि पोलीस प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहे.  
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये खून, प्राणघातक हल्ले, गोळीबार, घरफोडी, जबरी लूट, अपहरण करून मारहाण, दुचाकी चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनांमुळे पंचवटी पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही अंकुश नसल्याचे दिसत आहे. पोलिसांची भूमिका एकप्रकारे गुन्हेगारांना पोषक असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. 
पंचवटी परिसरातील गोदाघाट परिसरात रात्रीच्या सुमारास येणे मोठे धोकादायक मानले जाते. कारण या परिसरात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे नशेखोर रात्रीच्या सुमारास फिरत असतात. मात्र, सध्या हा परिसर दिवसादेखील सुरक्षित राहिलेला नाही. या परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाकी पळविल्या जात आहे. तर दुसरीकडे परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांच्या वस्तूंवर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे पंचवटी हि रामाची नाहीतर राक्षसांची झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. इतक्या गंभीर घटना घडून देखील या परिसरात सीसीटीव्ही लावले जात नसल्याची खंत देखील स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.  
पंचवटी परिसरात अनेक अवैध धंदे सुरु आहे. यामध्ये देहविक्री, अवैध घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार, पत्त्यांचे क्लब, बॉल गेम, मटका, जुगार, अंदर- बहार, काठी फिराव, झटपट लॉटरी, गांजा-भांग हे अंमली पदार्थ विक्री सर्रास चालू आहे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासत पंचवटी पोलीस या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. याबाबत वरिष्ठांना चाहूल लागताच त्यांनी पंचवटी पोलिसांना डावलून परिसरातील देहविक्री आणि गॅसच्या काळ्याबाजाराचा अड्डा उध्वस्त केला आहे. यावरून पंचवटी पोलीस नेमके काय काम करीत आहे याचा उलगडा होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Translate »
error: Content is protected !!