भाजपाला मोठे खिंडार; भाजप फुटीचा पंचवटी मधून श्रीगणेशा ! - CHECKMATE NEWS
राजकीय

भाजपाला मोठे खिंडार; भाजप फुटीचा पंचवटी मधून श्रीगणेशा !


पूर्व विधानसभेमध्ये ढिकले विरुद्ध गीते सामना रंगणार ?
गीते भाजपाला सोडचिट्ठी देत शरद पवार गटात जाणार ! पवार यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये तळ ठोकून !

नाशिक : गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते भाजपाला रामराम करणार आहे. यासाठी त्यांनी मुंबईमध्ये आपला तळ ठोकला आहे. पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणुकीचे तिकीट दिल्यास आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती गीते यांनी दिली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या अंतर्गत नाराजीचा श्रीगणेशा पंचवटी परिसरातून झाला आहे. गीते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यास पूर्व विधानसभा क्षेत्रात माजी आमदार राहुल ढिकले विरोध गणेश गीते असा सरळ सामना रंगण्याची चिन्हे आहे. 

          नाशिक मनपामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सलग दोन वर्ष स्थायी समिती सभापती म्हणून गणेश गीते यांनी कामकाज बघितले होते. गीते हे माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. अवघ्या काही वर्षात गीते यांनी भाजपमध्ये आपली पकड मजबूत करत जेष्ठ नेत्यांच्या विश्वासातील सहकारी म्हणून ओळख निर्माण केली होती. मनपाच्या तिजोरीच्या चाव्या हाती असल्याने भाजपाला पक्षाच्या कार्यक्रमासाठी मोठी आर्थिक रसद देखील गीते यांच्याकडून पुरवली जात होती. त्यामुळे त्यांचे पक्ष पातळीवर वजन चांगलेच वाढले होते. वजन वाढल्याने साहजिकच त्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहे. 
            नगरसेवक, एनडीसीसी बँक संचालक, मर्चंट बँक संचालक झाल्यानंतर त्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले. त्यांनी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. तसेच, विधान परिषदेच्या माध्यमातून तरी आमदारकी पदरात पडावी यासाठी देखील त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, विधानपरिषदेची दारे बंद झाल्याने त्यांनी थेट नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदार संघावर आपला दावा सांगितला. मात्र, या मतदार संघात आमदार म्हणून राहुल ढिकले निवडून आले होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क बघता त्यांचे तिकीट देखील जवळपास फायनल झाल्यासारखे असल्याची चर्चा आहे. उगाचच रिस्क नको म्हणून या मतदार संघात चेहरा बदलण्याचा कुठला विचार पक्ष नेतृत्वाने केलेला नाही. किंवा स्थानिक नेत्यांनी देखील त्याबाबत कुठलाही पर्याय सुचविलेला नाही. त्यामुळे राहुल ढिकले यांच्याशिवाय पक्षाला पूर्व विधानसभा क्षेत्रात पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. 
            मात्र, गणेश गीते यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या बॅनरवरून भाजप नेते आणि पक्ष चिन्ह काढून टाकलेले दिसून येत होते. तसेच, त्यांनी आपण तुतारीच्या चिन्हावर लढणार असल्याचे सूतोवाच देत तसा प्रचार देखील सुरु केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क सुरू केला होता. शुक्रवार दि. १८ रोजी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो असल्याचे सांगितले. तसेच,पवार यांनी देखील भेटीची वेळ दिली असल्याचे सांगत त्यांनी तिकिटासाठी होणार दिल्यास लागलीच पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नाशिकच्या पूर्व मतदार संघात ढिकले विरुद्ध गीते असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहे. 

Translate »
error: Content is protected !!