नाशिकमध्ये पक्षांतराचे वारे लागले वाहू ! - CHECKMATE NEWS
राजकीय

नाशिकमध्ये पक्षांतराचे वारे लागले वाहू !


येवल्यात अजित पवारांना तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना बूस्ट !

नाशिक : विधानसभेचे पडघम वाजू लागताच राजकीय नेत्यांचे पक्षांतर करण्याचे काम सुरु झाले आहे. येवला लासलगाव मतदार संघाचे उबाठा गटाचे माजी आमदार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटात असलेले अपूर्व हिरे यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाशिकच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहे. यामुळे मात्र, सर्व पक्षांची डोकेदुखी वाढणार असून, अनेक पदाधिकारी अपक्ष किंवा इतर पक्षांच्या चिन्हावर लढण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसत आहे. 

             येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी बुधवार दि. २३ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आ. पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांचे बळ अधिक वाढणार आहे. 
            तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आ. अपूर्व हिरे यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवबंधन मातोश्रीवर बांधले आहे. अपूर्व हिरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना मोठा फायदा होणार असून, या पक्ष प्रवेशामुळे भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे यंदा मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची तयारी केली होती. तसेच, हा मतदार संघ काँग्रेसला सुटणार असल्याचा त्यांना विश्वास होता. मात्र, हा मतदार संघ उबाठा शिवसेनेला देण्यात आला असून, यावर वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आल्याने. नाराज झालेल्या हेमलता पाटील यांनी सांगली प्रमाणे मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुरु केली आहे. तसेच, पक्षाने हा प्रस्ताव डावलल्यास थेट अपक्ष लढणार असल्याचे सांगितले आहे. डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीच्या वसंत गीते यांना बसल्याशिवाय राहणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
शिवसेना उबाठा गटाकडून नाशिक मध्य वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, मालेगाव बाह्य मधून डॉ. अद्वैय हिरे यांना पक्षाने एबी फॉर्म देऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. नाशिकच्या मध्य आणि पश्चिम मतदार संघात भाजप, काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये दिलेल्या उमेद्वारांवरून मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार आणि कोणते भक्कम उमेदवार देणार याकडे देखील नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

Translate »
error: Content is protected !!