नाशिक पूर्व मतदार संघातून सुनील बागुल यांच्या नावाची चाचपणी !
शरदचंद्र पवार गटाकडून बागुल यांना गळ घातल्याची चर्चा !
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विधानसभेचे वातावरण तापू लागले आहे. अनेक मतदार संघात उमेदवारांची घोषणा विविध पक्षांनी केली आहे. यामध्ये काही ठिकाणी नाराजी नाट्य सुरु झाले असून, मोठ्या प्रमाणात पक्षांतर देखील सुरु झाले आहे. असे असले तरी दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपकडून आ. राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, इतर पक्षांकडे सक्षम उमेदवार नसल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सुनील बागुल यांना गळ घातली जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पूर्व मतदार संघातून कोणाला तिकीट दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यात नाशिक पूर्व मधून महायुतीने राहुल ढिकले यांची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांनी आपला प्रचार देखील सुरु केला आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अतुल मते, जगदीश गोडसे हे इच्छुक असून, भाजपचे नाराज गणेश गीते हे देखील तुतारी हातात घेऊन विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. असे असले तरी शरदचंद्र पवार यांनी गीते यांना अद्याप पक्षात घेतलेले नाही. त्यामुळे येथील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही.
पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून सुनील बागुल यांनी नाशिकच्या राजकारणात आपला जम बसवला होता. त्यानंतर त्यांनी नाशिक मध्य मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बिनसल्याने त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्याठिकाणी त्यांचे मन रमत नसल्याने त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मात्र, लढाऊ बाणा अंगात असल्याने भाजपमध्ये देखील त्यांना काम करण्यास अडचणी येऊ लागल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतत हातात शिवबंधन बांधले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना उपनेते पद बहाल करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठे परिश्रम घेत राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे पक्षात आणि जनसामान्यांमध्ये बागुल यांचे वजन चांगलेच वाढले आहे.
बागुल यांचा वाढलेला जनसंपर्क बघून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुनील बागुल यांना पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात आली असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सध्या नाशिकच्या मतदार संघात ओबीसी चेहरे देण्यात आले आहे. त्यामुळे या मतदार संघात मराठा उमेदवार देऊन राष्ट्रवादी आपले मराठा कार्ड खेळणार असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास राहुल ढिकले यांना निवडणूक जिंकण्यासाठी मोठे आव्हान असणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे. त्यामुळे आता सुनील बागुल काय निर्णय घेता याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि नाशिककरांचे लक्ष लागले आहे.





