निवडणूक भरारी पथकाने पकडली करोडो रुपयांची रोकड !
निवडणूक निरीक्षक, पोलीस पथकाकडून नोटांची मोजणी सुरु !
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये एका हॉटेलमधून करोडो रुपयांची रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केली आहे. पोलीस आणि निवडणूक निरीक्षक यांच्या पथकाकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली असून रक्कम मोजण्याचे काम सुरु आहे. हि रक्कम नेमकी कोणासाठी नाशिकमध्ये आणण्यात आली याचा शोध सध्या घेतला जात असला तरी सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडे हि रक्कम सापडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलच्या रुममध्ये करोडो रुपयांची रक्कम पकडण्यात आली आहे. भरारी पथकाने सोमवारी(दि. १८) ही कारवाई केली असून रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जाणार आहे. निवडणूक पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूकीसाठी ही कोट्यावधीची रक्कम नाशिक मध्ये आणल्याची चर्चा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान एम. एच. ४१ क्रमांकाच्या गाडीतही काही रोकड सापडल्याने राजकीय पुढाऱ्यांचे डोळे विस्फारले आहे.





