अक्षरशः स्ट्रेचरवरुन येत केले मतदान…!!!!
डॉ. शिल्पा कवीश्वर यांचा मतदानाबाबत प्रेरणादायी संदेश !मतदानाला न जाणाऱ्या मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना !
नाशिक : भारताच्या लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. याच मतदानाच्या हक्कातून आपण आपल्या मनातील सरकारची निवड करू शकतो. इतक्या मोठ्या मिळालेल्या हक्काचे महत्व अदयाप अनेक देशवासियांना नसल्याचे दुर्दैची चित्र मतदानाच्या समोर येणाऱ्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. मात्र, अशाही परिस्थितीमध्ये काही जागरूक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट स्ट्रेचरवरून जेव्हा मतदान केंद्रात येतात तेव्हा त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच म्हणायला हवे. अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. नाशिकमधील डॉ. शिल्पा कवीश्वर यांची मतदानाबाबत प्रेरणादायक घटना एका आदर्श नागरिकतेचे उदाहरण ठरताना दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या अपघातात गुडघ्याखालील हाडाचा चुरा झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी पायाची हालचाल न करण्याचा सल्ला दिला होता. तरीही, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले.

नाशिक मध्य मतदार संघातील काठे गल्ली परिसरातील शंकर नगर येथे राहणाऱ्या डॉ. शिल्पा कवीश्वर
यांचा पंधरा दिवसापूर्वी मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या गुडघ्या खालील हाडांचा चुरा झाल्याने त्यांच्यावर रीप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पायाची हालचाल करू नये असे बजावले होते.
मात्र, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या असून त्याचे मतदान बुधवार दि. २० रोजी होणार होते. त्यामुळे डॉ. शिल्पा कवीश्वर यांनी मतदानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना हालचाल न करण्याचा सल्ला दिला असल्याने त्यांना लिफ्ट नसलेल्या सोसायटीमधून मतदान केंद्रापर्यंत कसे न्यावे हा मोठा प्रश्न होता. मात्र, म्हणतात ना इच्छा असेल तेथे मार्ग निघतोच. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या कल्पना वाणी, स्नेहल कुलकर्णी, ॲड. महेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक अर्चना थोरात, मिलिंद भालेराव आणि त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत डॉ. शिल्पा यांना एका चादरीमध्ये घेत उचलून खाली आणले. त्यानंतर स्ट्रेचरवर ठेवून त्यांना वाहनामधून मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आले. त्यानंतर मतदानाच्या नियमाप्रमाणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या मतदानामुळे त्यांनी मतदान न करणाऱ्या मतदारांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहेत. मतदानाचे महत्त्व जाणीव करून देणारी ही घटना दर्शवते की, लोकशाहीत भाग घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, जरी शारीरिक अडचणी असल्या तरी.
डॉ. शिल्पा कवीश्वर यांना ज्या पद्धतीने मतदान केंद्रवार आणण्यात आले आणि त्यांनी ज्या जिद्दीने मतदानाचा हक्क बजावला हा मतदान न करणाऱ्या अन्य नागरिकांसाठी एक प्रेरणादायक संदेश होता असे म्हणायला हरकत नाही. कारण नाशिक जिल्ह्यात जवळपास ६८ टक्के आणि शहरात ५७ टक्के इतकेच मतदान झाले आहे. त्यामुळे पवित्र असलेल्या मतदानाचा हक्क जवळपास ३० ते ३५ टक्के मतदारांनी बजावला नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. त्यामुळे डॉ. शिल्पा कवीश्वर यांची हि हिम्मत आणि कर्तव्याचा आदर्श इतरांसाठी एक प्रेरणा ठरावी.





