पुन्हा एकदा शिवशाही जळून खाक ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

पुन्हा एकदा शिवशाही जळून खाक !


चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जीवित हानी टळली !
अकोला : शेगाववरून अकोला येथे जात असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक ६ वर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
             याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्ग क्रमांक ६ वरील रिधोरा परिसरातील हॉटेल तुषार जवळ गुरुवार दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेगाव कडून अकोल्याच्या दिशने जाणाऱ्या शिवशाही बसला भीषण आग लागली. या लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. या बसमध्ये ४४ प्रवासी प्रवास करीत होते.
            चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आल्याने आणि आग लागल्याची घटना लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बसला रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, यानंतर पाहता पाहता बसमला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील अग्निरोधक सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी काही नागरिकांनीही मदत केली. मात्र, आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस संपूर्ण जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी देखील महाराष्ट्रातील अनेक महामार्गावर शिवशाही बसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच, अनेकदा या शिवशाही बस रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवशाहीला लागलेल्या आगीमुळे या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर राज्य शासन काय तोडगा काढते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

Translate »
error: Content is protected !!