पोलीस नव्हे शहरात गुन्हेगारांचेच साम्राज्य ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

पोलीस नव्हे शहरात गुन्हेगारांचेच साम्राज्य !


दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्यामुळे पोलीस यंत्रणेचे वाभाडे !
पडद्याआडून गुन्हेगारांना पोलीस संरक्षण देत असल्याची चर्चा !

नाशिक : नाशिकची पोलिसिंग किती रसातळाला गेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवसाढवळ्या अंबड परिसरात टाकण्यात आलेला सशस्त्र दरोडा. दरोडा टाकून तिघे दरोडेखोर एकाच बुलेटवर फरार होत असताना त्यांना शहरातील एकाही चौकात पोलिसांकडून अटकाव करण्यात आला नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. कारण सध्या चौकाचौकात अनेक सामान्य नाशिककरांना वाहतूक पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अजूनच भर पडली आहे. नाशिकच्या फेल झालेल्या पोलिसिंगला काही पोलीस अधिकारीच कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण गोळीबार, तडीपार गुन्हेगारांकडून खंडणीसाठी तोडफोड करून देखील गुन्हे दाखल केले नसल्याने एकप्रकारे या अधिकाऱ्यांनी थेट गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम पडद्याआडून सुरु केले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पोलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे शहरात पोलिसांचे नाहीतर गुन्हेगारांचे साम्राज्य असल्याची चर्चा चौकाचौकात सुरु झाली आहे. 

          सध्या नाशिक शहरातील पोलीस प्रशासन कायम त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून शांत असलेले शहर गुन्हेगारांनी वेठीस धरले असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. गुन्हेगारांकडून शहरात टोळीयुद्ध, गोळीबार, खंडणी, दरोडे, जबरी लूट, वाहने चोरी, भाविकांची लूट, पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले, खंडणीसाठी तडीपार शहरात येऊन गोळ्या मारण्याची धमकी देत लूट करून निघून जाणे, माजी महापौरांच्या जावयाच्या आलिशान कारची चोरी करणे असे एकनाअनेक गुन्हे शहरात घडू लागले आहे. यातील काही गुन्हे रेकॉर्डवर येत आहे. तर अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना एकप्रकारे संरक्षण देऊन गुन्हे दाखल न करण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी भूमिका घेतली आहे. यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच मनोबल वाढले आहे. त्यामुळे वर्षभरापासून शहरात गुन्हेगारीचे एकप्रकारे पेव फुटले आहे. यासाठी पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम राबवत असले तरी दुसरीकडे गुन्हेगार खून आणि लूटमार करीत पोलीस प्रशासनाला खुले आव्हान देत असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. 
              याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड परिसरातील डीजीपीनगर येथे दीपक सुधाकर घोडके यांचे श्री. ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवार दि. १७ रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घोडके आणि त्यांच्या पत्नी आपल्या ज्वेलर्सच्या दुकानात बसलेले असताना अचानक अज्ञात तिघा दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करीत घोडके दांपत्याला पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील जवळपास तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच पळून जाताना घोडके दांपत्याच्या तोंडावर स्प्रे मारला. आणि आपल्या साथीदारांसह बुलेटवर बसून उजळ माथ्याने बसून फरार झाले. दिवसाढवळ्या टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचे दावे करणाऱ्या पोलीस यंत्रणेचे चांगलेच वाभाडे निघाले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. 
पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ठासून सांगण्याचे कारण म्हणजे शहरात लावण्यात आलेले विनापरवानगी बेकायदेशीर गुन्हेगारांचे फलक. उच्च न्यायालयाचा अवमान करून हे फलक पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून उभे करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने पोलिसांना थेट अशा बेकायदेशीर फलकबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना देखील पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढणार यात तिळमात्र शंका नाही. खून, प्राणघातक हल्ले, गोळीबार, टोळीयुद्ध करणाऱ्या संशयित गुन्हेगारांचे फलक बघून सामान्य नाशिककर स्वतःला असुरक्षित समजू लागला आहे. मात्र, याचे कुठलेही सोयर सुतक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक किंवा त्यांच्या सुभेदारांना नसल्याचे दिसत आहे. 

Translate »
error: Content is protected !!