पोलीस प्रशासनाविरोधात नागरिक रस्त्यावर !
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा !दुहेरी हत्याकांडात दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे !खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी !
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधलेनगर येथील आंबेडकर वाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव, ३२ आणि प्रशांत भगवान जाधव ३० या दोघा भावांची संशयित आरोपी सागर मधुकर गरड, ३२, रा. आंबेडकर वाडी उपनगर नाशिक, अनिल विष्णु रेडेकर, ४०, रा. उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक, सचिन विष्णु रेडेकर, ४४, रा. गायत्री नगर, पुनारोड नाशिक, अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे, २६, रा. सर्वेश्वर चौक, नविन सिडको उत्तमनगर, नाशिक, योगेश चंद्रकांत रोकडे, ३०, रा. आंबेडकर वाडी, उपनगर नाशिक यांनी पूर्व वैमन्यासातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणून धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निर्घृण हत्या केली होती. शहरात सुरु असलेल्या खुनांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नाशिककरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
गोमांस विक्री करणाऱ्यांशी सतत संपर्क ठेवल्याने आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयितांसोबत सहभाग निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस हवालदार युवराज पाटील याला निलंबित केले आहे. तसेच, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयितांबरोबर सहभाग निष्पन्न झाल्याने पाटील याला सहआरोपी करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ आहे. मात्र, पोलीस कर्मचारीच गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करत असल्याने नाशिक पोलीस प्रशासनाची इमेज चांगलीच डागाळली आहे.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या – फिर्यादीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना निलंबित करा, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सहआरोपी करणे हि महत्वाची मागणीचे फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गवळी यांना सहआरोपी करून सेवेतून बडतर्फ करा, गुन्हे शाखा एक मधील पोलीस कर्मचारी विशाल काठे, परदेशी याला सहआरोपी करा, अवैध धंदे चालक बाळू पाटील याला सहआरोपी करा, जलद गती न्यायालयात खटला चालवावा, संशयितांवर मोक्कान्वये कारवाई करावी, मुख्य सूत्रधाराला अटक करावी, दोन फुटाच्या एका कोयत्याने दोघा भावांवर पन्नास वर्मी घाव होऊ शकता का? अशा आशयाचे आणि मागण्यांचे फलक हातात घेऊन मूकमोर्चा काढण्यात आला होता.
संशयित आरोपींना फाशी झालीच पाहिजे. कारण संशयित बाहेर आल्यास आम्हालाही मारून टाकतील. संशयितांना साथ देणाऱ्या पोलिसांना देखील फाशी व्हायला हवी. पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करून निलंबित करावे. पैशासाठी माझ्या मुलांना मारून टाकले आहे. लोकांना मारण्यासाठी पोलीस पैसे घेतात का ?: अंजना जाधव, मयत जाधव बंधूंची आई







: अंजना जाधव, मयत जाधव बंधूंची आई 