भांडण सोडवणे बेतले रिक्षा चालकाच्या जीवावर ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

भांडण सोडवणे बेतले रिक्षा चालकाच्या जीवावर !


कोयत्याने वार करीत युवकाची निर्घृण हत्या !
रस्त्यावरील गुन्हेगारीसोबत पोलीस दलातील गुन्हेगारीचे पोलीस आयुक्तांसमोर आव्हान !

नाशिक : नाशिक शहरात खुनाचे सत्र अद्यापही सुरूच आहे. भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांच्या मागावर रवाना झाले आहे. या खुनाच्या घटनेमुळे कामगार वस्तीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. फक्त भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रकाश सूर्यवंशी यांना आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या आई, पत्नी आणि तीन मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यवसायाने रिक्षा चालक असलेले प्रकाश मधुकर सूर्यवंशी, ४२, रा. नरेंद्र छाया हाईट्स, श्रमिक नगर, सातपूर गुरुवार दि. १० रोजी नेहमीप्रमाणे जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांच्याच अपार्टमेंट मध्ये राहणारे गणेश उत्तम पाटील यांच्यासह रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास संशयित संघर्ष मोरे, प्रेम संदीप जाधव, प्रमोद भगत आणि त्यांच्यासोबत असलेला एका अनोळखी संशयितांनी अचानक येऊन प्रकाश आणि गणेश यांना शिवीगाळ करायला लागले. तसेच, या संशयितांनी गणेश पाटील याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी प्रकाश सूर्यवंशी गेले असता संशयितांनी त्यांनाच घेरून गंभीर मारहाण सुरु केली. संशयितांनी हातातील कोयते, फायटरने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी गणेश पाटील हा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, प्रकाश सूर्यवंशी यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेतमध्ये आपल्या घरी आले. आणि त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. यावेळी प्रकाश यांच्या पत्नीने त्यांना शेजारच्यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन सूर्यवंशी यांना जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्याने आणि वर्मी घाव लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. मात्र, रस्त्यावरील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्याऐवजी पोलीस खात्यातील मुजोर कर्मचारी अवैध धंदे चालकांकडून वसुली करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यातच फ्रीस्टाईल करीत एकमेकांचे कपडे फाडतांना दिसत आहे. तर दुसरीकडे गोवंश कत्तल आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयितांसोबत असल्याचे सिद्ध झाल्याने पोलीस हवालदार युवराज पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला सह आरोपी करण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर ओढवली आहे. तसेच, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जाधव भावंडांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत नागरिक मोर्चा काढून रस्त्यावर उतरत आहे. यामुळे शहरात पोलीस प्रशासनाचे आणि गुन्हेगारांचे चांगलेच हितसंबंध जोपासले जात असल्याची उघड होत चर्चा रंगू लागली आहे. असे असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सरकारवाडा पोलीस कर्मचारी हाणामारी प्रकरण आणि उपनगर दुहेरी हत्याकांड प्रकरण अद्याप सिरीयस घेतलेले नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी ऍक्शन मोडवर येत पोलीस प्रशासनातील वर्दीतील गुंडांची असलेली दादागिरी मोडत काढून एक आदर्श घालून द्यावा अशी मागणी देखील केली जात आहे. 

Translate »
error: Content is protected !!