माजी आमदाराविरोधात तोतयेगिरी केल्याचा गुन्हा दाखल ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

माजी आमदाराविरोधात तोतयेगिरी केल्याचा गुन्हा दाखल !


राष्ट्रीय चिन्ह, सरकारी शिक्के आणि लेटर हेडचा गैर वापर ! 

नाशिक : माजी विधान परिषद आमदाराने राष्ट्रीय चिन्ह, सरकारी शिक्के आणि लेटर हेडचा गैर वापर केला म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येवला येथील शिवसृष्टीची माहिती बांधकाम विभागाकडे मागितल्याबाबतचे लेटरहेड सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यामुळे याला वाचा फुटली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगितले. 

           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि अंबादास जगन्नाथ खैरे, ४३, रा. विजयनगर कॉलनी, संभाजीनगर नाका, पंचवटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी विधान परिषद सदस्य नरेंद्र भिकाजी दराडे यांनी विद्यमान विधान परिषद सदस्य असल्याचे भासवून पत्रव्यवहारामध्ये राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र दराडे हे विधान परिषद किंवा विधानसभा सदनाचे सदस्य नाही. असे असताना देखील दराडे हे आपल्या लेटरहेडवर स्वतःचे नाव त्याखाली विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य असा मजकूर असलेला शिक्का मारून त्यावर स्वाक्षरी करीत आहे. तसेच, स्वतःच्या वाहनावर विधान परिषद सदस्य असे स्टिकर लावून फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. नरेंद्र दराडे यांच्या विधान परिषद सदस्य पदाची मुदत २१ जून २०२४ रोजी संपलेली आहे. 
            असे असताना देखील नरेंद्र दराडे यांचे ११ सप्टेंबर २०२४ रोजी लेटरहेडवरील एक पत्र व्हाट्सऍपवर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये नरेंद्र दराडे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पूर्व) नाशिक यांना उद्देशून त्यांच्या कार्यालयात दिले आहे. त्यामध्ये विषय म्हणून येवला येथील शिवश्रुष्टि प्रकल्प उभारणे या प्रकल्पाची अद्यावत माहिती सादर होण्याबाबत नमूद केलेले आहे. या लेटरहेडवर विधानसभेचे प्रतिक, मध्यभागी तीन सिंह आणि धम्मचक्र असलेले राष्ट्रीय चिन्ह आणि सत्यमेव जयते असे बोध वाक्य आहे. आणि नरेंद्र भिकाजी दराडे, सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य असे नाव, पद नमूद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भारताचे राष्ट्रीय चिन्ह, प्रतीक वापरण्यास परवानगी नसताना देखील दराडे यांनी त्याचा गैरवापर केला म्हणून दराडे यांच्याविरोधात लोकसेवक नसताना तोतयेगिरी केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहे. 

Translate »
error: Content is protected !!