सराईत गुन्हेगारांच्या छबीला “खा”की प्रतिष्ठा !
श्रीरामाच्या भुमीला विद्रूपीकरणाचा डाग ; कायदा सुव्यवस्थेची शिलाई उध्वस्त !
नाशिक : (प्रतिनिधी) नवा गडी नवा राज ही उक्ती प्रत्यक्षात कृतीत आणण्यात नाशिक शहराचे पोलीस आणि मनपा प्रशासन कुठलीच कंजूषी करीत नसल्याने कारभारी म्हणविणारे अधिकारी शहरात बदलून आले की नवी कार्यप्रणाली नाशिककरांना पहायला मिळते. नाशिक शहराचे सौंदर्य वेशीवर टांगणारे चौकाचौकातील सराईत गुन्हेगारांच्या आपल्या छबीचे बेकायदेशीर फलक या नव्या कार्य प्रणालीची जाणिव करून देत आहेत. महिन्याभरापासून अशा बहुचर्चित गुंडपुडांची छबी असलेले हे फलक शहराचे विद्रुपीकरण करीत असतांना त्याला पोलीस प्रशासनाकडून कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही. यापुर्वीच्या कारभारी मंडळींनी शहरातील फलक लावण्यासाठी तयार केलेली आचार संहीता वजा नियमावली नव्या कारभारी मंडळींच्या कार्यकाळात लुप्त झाल्याचे या वाढत्या फलक प्रस्थांनी दाखवून दिले आहे.
पंचवटी परिसरात अशाच एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लागताच पंचवटी पोलीस जागे झाले आणि त्यांनी तात्काळ मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला हाताशी घेत हे फलक हटवत शो बाजी केली. मात्र, या कारवाईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठाफाटा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचे बेकायदेशीर फलक थेट मनपाच्या दिशादर्शक कमानीवर झळकत असताना ते बेकायदेशीर असल्याचे पोलीस आणि मनपा प्रशासनाला दिसले नाही का ? त्याचा पोलिसांना अडसर वाटला नाही का ? संबंधित सराईत गुन्हेगार आहे याची माहिती पोलिसांना नाही का ? असे एकनाअनेक प्रश्न सामान्य नाशिककरांना पडले आहेत. त्यामुळे कारवाई फक्त दिखाव्यापुरती केली जात असल्याचा सूर नागरिकांनी आळवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चौकाचौकात बेकायदेशीररित्या सराईत गुन्हेगारांनी आपले मोठमोठे होर्डिंग लावत अक्षरशः शहराचे विद्रुपीकरण करून वेठीस धरल्याचे चित्र नाशिककरांनी अनुभवले आहे. मात्र, त्यावर गांधारीच्या भूमिकेत असलेल्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे उन्मत्त झालेल्या गुन्हेगारांनी सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने चौक देखील बंद केले. कर्णकर्कश डीजेचा धांगडधिंगा आणि लेझर लाईटच्या माऱ्यामुळे अनेकांना कानाचा आणि डोळ्याचा त्रास देखील झाला. मात्र, त्याची कैफियत कोणाकडे मांडणार असा प्रश्न त्यांना पडला होता. विशेष म्हणजे या कर्णकर्कश डीजेच्या आवाजाची पातळी देखील पोलीस प्रशासनाकडून मोजण्यात आली नसल्याचे दिसत आहे. कारण एकाही पोलीस ठाण्यात तशा प्रकाराचा गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे चेकमेटच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपण केलेल्या कामगिरीच्या माध्यमातून कायम चर्चेत राहणाऱ्या पंचवटी पोलिसांनी गुरुवार दि. २७ रोजी दिंडोरी नाका, सेवाकुंज, काट्या मारोती चौक यासह अनेक ठिकाणी वाढदिवसाचे बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या सराईत गुन्हेगार अविनाश महावीर कौलकर याचे होर्डिंग हटवत कारवाई केली. तसेच, यापुढे अशा प्रकारे गुन्हेगारांचे होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. तसे, देर आये दुरुस्त आये असेच म्हणायला हवे. मात्र, हि कारवाई करताना अवघ्या हाकेच्या अंतरावर एका सराईत गुन्हेगाराचे फलक झळकत असल्याचा पंचवटी पोलिसांना विसर पडला कि काय ? कि अजून कारवाईत दुजाभाव केला जात असावा असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला.
आता या पेठफाटा चौकातील होर्डिंग आज लागलेले नाही. हे बेकायदेशीर फलक गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिनदिक्कत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिमाखात झळकत आहे. त्यामुळे हि कारवाई म्हणजे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी तर केली नसावी ना, असाही प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण सर्व सराईत गुन्हेगार कायद्यापुढे सारखेच असायला हवेत. अशा दुजाभाव पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे नक्कीच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होणार यात शंका नाही.
पेठफाटा येथे लावण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात देखील खून, प्राणघातक हल्ले, बंदूक दाखवून हप्ते मागणे यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात आहे. नुकत्याच एका भाजी विक्रेत्याकडे पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे, असताना देखील पोलीस त्याच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याने या गुन्हेगाराची परिसरात दहशत वाढत चालली असल्याचे बोलले जात आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर विद्रुपीकरण करणाऱ्या गुन्हेगार नाही तर सर्वच फलकबजांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहे. तसेच, बेकायदेशीर फलकांवर झळकणाऱ्या नेते आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र, फक्त गुन्हेगारांचे होर्डिंग हटवून इतर बेकायदेशीर होर्डिंग आणि फलकांना अभय का दिले जात आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून एकप्रकारे उच्च न्यायालयाचा सर्रास अवमान केला जात असल्याचे दिसून येत आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे.





