अंमली पदार्थ विक्री प्रकरणी पोलीस हवालदार झाला आरोपी !
पोलीस हवालदार युवराज पाटील निलंबित !अवैध धंद्यात सहभाग उघड झाल्याने सहआरोपी म्हणून कारवाई !पोलीस आयुक्तांच्या कारवाईमुळे सुभेदारांमध्ये खळबळ !
नाशिक : नाशिक पोलीस दलातील पोलीस हवालदाराला गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्तांनी सहआरोपी करीत त्याला निलंबित केले आहे. थेट पोलीस हवालदाराला आरोपी करून त्याचे निलंबन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर आयुक्तांनी अशाच पद्धतीने विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखेमधील सुभेदारांच्या फोन रेकॉर्डची तपासणी करून त्यांच्यवर देखील कारवाई करावी अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु झाली आहे
पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार युवराज शांताराम पाटील असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक आदेश काढून युवराज पाटील याला निलंबित केले आहे. या आदेशामध्ये म्हटले आहे की, पोलीस हवालदार युवराज पाटील याचा भद्रकाली, इंदिरानगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे वारंवार संप्परक आणि संभाषण झाले आहे. तसेच, इंदिरानगर, भद्रकाली पोलीस ठाणे येथे गोवंश मांस विक्री, वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे कायम संपर्क आणि संभाषण झाले असल्याचे दिसून आले आहे. तसेच, इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ गुन्ह्यात पाटील याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याचा पाहिजे आरोपी म्हणून समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाटील हा अंमली पदार्थ विक्रीमध्ये सहआरोपी करण्यात आला आहे.
त्यामुळे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महत्वाच्या पदावर कार्यरत असताना आणि नियम-विनियमांची जाणीव असताना देखील गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस खात्याच्या शिस्तीस न शोभणारे वर्तन केल्याने निलंबित केल्याचे आदेश आहे. निलंबित कार्यकाळात पाटील याला राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय येथे दिवसातून दोनवेळा हजेरी देण्याचे आणि परवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात आणि गुन्हे शाखेमध्ये अनेक सुभेदार, कलेक्टर कार्यरत आहे. हे सुभेदार गोवंश कत्तल, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आणि अवैध धंदे चालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली करून आपल्या वरिष्ठांपर्यंत पाकीट पोहचविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचे थेट संबंध गुन्हेगारांशी असतात त्यांचेही फोन कॉल रेकॉर्ड तपासल्यास पोलीस दलातील अनेक झारीतील शुक्राचार्य बाहेर येतील. अशा सुभेदारांना वेळीच त्यांची जागा दाखविल्यास प्रामाणिक कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.





