औषधी द्रव्य आणि इंजेक्शनच्या आडून गुटख्याची तस्करी ! - CHECKMATE NEWS
क्राईममहाराष्ट्र

औषधी द्रव्य आणि इंजेक्शनच्या आडून गुटख्याची तस्करी !


साडेचार लाखांच्या गुटख्यासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त !

नाशिक : गुजरात राज्यातून चेन्नई येथे जणारा गुटखा पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पकडला आहे. इंजेक्शन आणि औषधी द्रव्याच्या आडून गुटखा तस्करी करण्यात येत असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. ट्रकमधून जवळपास गुटख्याच्या ६० गोण्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून, याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवळपास साडेचार लाख रुपयाच्या गुटख्यासह १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

            महाराष्ट्रात राज्यात बंदी असलेला गुटखा (सुगंधित तंबाखू) मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये सर्रास विकला जात आहे. शहरात कुठल्याही पानदुकानावर अथवा किराणा दुकानात गेल्यास खुलेआम पद्धतीने गुटख्याची विक्री होताना दिसत आहे. याबाबत पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आल्या आहे. मात्र, तरीही शहरात गुटखा येण्याचे प्रमाण कुठेही कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनेकदा नाराजी व्यक्त करीत गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. 

                पंचवटी गुन्हे शाखेच्या पथकाला गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तारवाला नगर सिग्नल परिसरात सापळा लावला होता. यावेळी ट्रक क्रमांक जी. जे. २७ आय. डी. ६११६ हा जोरात अमृत धामच्या दिशेने जाताना या पथकाला दिसला. या ट्रकचा पाठलाग करून त्याला अडवून ट्रक मध्ये असलेल्या मालाबाबत चालक देविसिंह भरत सिंह, २९, रा. नटेला, ता. दऱ्यावत, जि. प्रतापगढ, राजस्थान याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलीस पथकाने ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये विविध इंजेक्शन आणि औषधी द्रव्य असलेल्या खोक्यांसह त्यामागे ठेवलेल्या गोण्यांमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून त्यातील सर्व गोण्या उतरविल्या असता ६० गोण्यांमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आला. याबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पंचनामा झाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गुटखा आणि ११ लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा एकूण १५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
अहमदाबाद येथील प्रीतेशभाई आणि चेन्नई येथील पांडे नामक यांनी गुटखा घेण्याबाबत फोन केल्याचे चालक देवीसिंह याने सांगितले आहे. त्यामुळे प्रीतेशभाई आणि पांडे यांचा या गुटखा तस्करी मागे नेमकी त्यांची असलेली भूमिका काय आहे याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कारण गुटखा तस्करीचा तपास चांगल्या रीतीने झाल्याने एखादे आंतरराष्ट्रीय गुटखा तस्करांचे रॅकेट पोलिसांच्या जाळयात सापडू शकते. त्यामुळे याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणे गरजेचे आहे. 
पोलिसांना संशय येऊ नये आणि कुठेही वाहनांची तपासणी झाल्यास काही अडचण येऊ नये यासाठी गुटखा तस्करांनी औषधी द्रव्य आणि इंजेक्शन घेऊन जाणाऱ्या वाहनात गुटखा तस्करी करण्याचा नवीन फंडा अंमलात आणल्याचे दिसत आहे. नेमका हा गुटखा चेन्नई येथे जाणार होता की, नाशिकमध्ये उतरविला जाणार होता याचा तपास करणे गरजेचे आहे. तसेच, गुटखा तस्करांनी गुटखा शहरात आणण्यासाठी अजून काही नवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली का याचाही पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.

Translate »
error: Content is protected !!