फरार सावकार वैभव देवरेच्या पुण्यात आवळल्या मुसक्या !
वैभव देवरे विरोधात सावकारीचे अनेक गुन्हे दाखल !
नाशिक : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सावकारी जाचाला कंटाळुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सराईत सावकारी गुन्हेगार वैभव देवरे याला गुंडा विरोधी पथकाने पुण्यात अटक केली आहे. संशयित देवरे विरोधात विविध पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहे. सावकारकीच्या गुन्ह्यात संशयित वैभव देवरे याची पत्नी आणि एका साथीदाराला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. २० रोजी फिर्यादी गितांजली धिरज पवार यांनी संशयित वैभव यादवराव देवरे, सोनल वैभव देवरे, निखील नामदेव पवार यांच्या सावकारी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात संशयित सोनल वैभव देवरे, निखील नामदेव पवार यांना पोलिसांनी अटक केली होती. तर वैभव देवरे हा फरार झाला होता. देवरे फरार झाल्यानंतर त्याच्याविरोधात अनेक तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधत त्याच्या सावकारीच्या जाचाविरोधात तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे देवरे याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली होती.
गुन्ह्याचे वाढते गांभीर्य बघून पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी वैभव देवरेच्या मुसक्या आवळ्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी आरोपी वैभव देवरे याची माहिती काढण्यासाठी दोन पथके वेगवेगळया ठिकाणी रवाना केली होती. दरम्यान गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदिप ठाकरे यांना माहिती मिळाली की, संशयित देवरे हा पुणे परिसरात आहे. देवरेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, अशोक आघाव यांच्या पथकाने पुणे येथे सलग चार दिवस वेषांतर करून नाशिक येथून पुणे येथे स्थायिक झालेले संशयिताच्या संपर्कातील लोकांची स्थानिक नागरिकांकडुन माहिती घेतली.
यावेळी पोलीस पथकाला पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव परिसरात संशयित असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सापळा रचला. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंपरी चिंचवड हददीतील लेन नं. ५, श्रीहरी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे येथून संशयित आरोपी वैभव यादवराव देवरे, ४०, रा. फ्लॅट नं ७, सिमा पार्क, चेतनानगर, नाशिक याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले असुन, त्याला पुढील तपासकामी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संशयित सावकार वैभव यादवराव देवरे यांच्याविरोधात इंदिरानगर, गंगापूर, मुंबईनाका, अंबड, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांमध्ये सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण आदींसह विविध कलमान्वये ११ गुन्हे दाखल आहे. तसेच, सावकार देवरे विरोधात अजूनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच, देवरे याने ज्या ज्या नागरिकांना सावकारीसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी त्रास दिला असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोउनि मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनील आडके, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, अशोक आघाव, राजेश राठोड, सुनिता कवडे आदींसह तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक जयश्री तारडे आणि त्यांच्या टीमने संयुक्तरित्या कामगिरी केली आहे.





