महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी नाशिक आश्रम पुन्हा चर्चेत !
सर्वांचे आका म्हणजेच दिंडोरी मधील मोरे काका !
स्वामी समर्थ गुरुपीठाचे अण्णा मोरे आणि त्यांच्या तीन मुलांसह पीडित महिला व काही पोलिसांची देखील एसआयटी चौकशी करा : संभाजी ब्रिगेड
नाशिक : नाशिकमधील अण्णा मोरे यांनी एका महिलेचे शोषण केल्याबाबत डिसेंबर २०२४ मध्ये नाव न छापता काही माध्यमांनी बातमी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, याबाबत पैशांच्या जोरावर त्यांना कायदेशीर नोटीस देत त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपींनी दिंडोरी येथील अण्णा मोरे यांच्या आश्रमात आश्रय घेतल्याचे आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेडने केले आहे. तसेच, या आश्रमात अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केला आहे. त्यामुळे या आश्रमाची आणि येथील आकाची चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत आश्रमाच्या वतीने या प्रकाराशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहे. मात्र, आग लागल्यानंतरच धूर उठतो हे आश्रम चालकांनी लक्षात घ्यायला हवे आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दडपण्यात आलेले प्रकरण पुन्हा अंगलट येत असल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीड सह संपूर्ण महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात विष्णू चाटे सह राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर राजकीय विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. खंडणी व खून प्रकरणानंतर वाल्मिक कराड अनेक दिवसांपर्यंत फरार असल्याने विरोधकांसह सामाजिक संघटनांनी देखील सरकारचा निषेध करत थेट धनंजय मुंडे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाताना चित्र संपूर्ण महाराष्ट्र निर्माण झालेली असतानाच वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. त्याला अटक झाल्यानंतर प्रकरण थांबेल की काय असे वाटत असतानाच खंडणी व खून प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होऊ लागल्याने या प्रकरणाची गंभीरता दिवसागणिक वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
वाल्मिक कराडशी संबंध असलेल्या एसआयटीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशी पथकातून बाहेर काढल्यानंतर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या विषयात एन्ट्री करत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे. यावेळी तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की दिनांक १५ व १६ डिसेंबर २०२४ म्हणजेच वाल्मिक कराड व विष्णू चाटे फरार असताना नाशिक मधील दिंडोरी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या आश्रमात आश्रयास होते. त्यांना गुरु पिठाचे श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णा मोरे यांनी व त्यांच्या मुलांनी आश्रय दिला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत १७ तारखेला सीआयडी पथक सदर आश्रमात पोहोचले व त्यांनी अण्णा मोरे व त्यांच्या मुलांकडून सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतल्याचे देसाई यांनी सांगितले. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपींना मदत करणाऱ्या गुरु पिठाच्या अण्णा मोरे यांना देखील बीडच्या गुन्ह्यात सह आरोपी करून घ्यावे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. सीआयडीने देखील सर्व तपास झाल्यानंतर दिंडोरी आश्रमातून घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेज प्रसारित कराव्यात म्हणजे त्यातून नेमके सत्य काय हे सर्वांना समजेल. त्याचप्रमाणे गुरु पिठाचे अण्णा मोरे यांनी अनेक महिलांचे शारीरिक शोषण केले असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे असल्याबाबत त्यांनी स्पष्ट केले यावर लवकरच स्वतंत्र लढा उभा करणार असे त्यांनी सांगितले.
आबा मोरे यांनी मांडली मोरे कुटुंबीय व आश्रमाची बाजू – या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर माध्यमांनी दिंडोरी येथील अण्णा मोरे यांच्या आश्रमात धाव घेत या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना आश्रय दिल्या बाबत विचारले असता, या ठिकाणी कोणालाही आश्रय दिले नसल्याचे आबा मोरे यांनी स्पष्ट केले. तर वाल्मिक कराड व विष्णू चाटे हे इतर भक्तांप्रमाणेच दर्शन घेण्यासाठी आलेले असावेत त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काहीही माहित नाही. याबाबत आवश्यक असलेले सीसीटीव्ही फुटेज सीआयडी पथकाने तपासकामी ताब्यात घेतले असून या प्रकरणाशी आश्रम व मोरे कुटुंबीयांचा काही एक संबंध नसल्याचे सांगत त्यांनी हात झटकले आहे. परंतु आबा मोरे याने दिलेले स्पष्टीकरण न पटणारे असून लाखो भक्त जर आश्रमात ये जा करत होते तर मग इतक्या दिवसापासून माध्यमांवर तसेच सामाजिक माध्यमांवर वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांचा वारंवार व्हायरल होणारा फोटो पाहून कोणी त्यांना ओळखले नाही का ? असे कसे होऊ शकते, त्यामुळे मोरे यांच्या खुलाशाबाबत संशयकल्लोळ अधिक वाढला आहे.
अण्णा मोरे व पीडित महिला यांच्या कथित बलात्कार आरोपाची चौकशी व्हावी : संभाजी ब्रिगेड
पीडित महिला यांनी संभाजी ब्रिगेड व सकल हिंदू समाज या हिंदू संघटनांना त्यांच्यावर स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णा मोरे यांनी लग्नाचे आमिष दाखवत आठ ते दहा वर्ष लैंगिक शोषण केल्याचे कथन केले आहे. पीडित महिला आणि अण्णा मोरे यांच्यातील नग्न अवस्थेतील आक्षेपार्य व्हिडिओ देखील पीडित महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांना आणि माध्यमांकडे देत आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी ऑन कॅमेरा आणि लेखी स्वरूपात विनंती केली होती. दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक मधील पंचवटी पोलीस ठाण्यात श्रीराम उर्फ अण्णा मोरे यांच्या विरोधात पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रारदार महिलेच्या विरोधातच गंगापूर पोलीस ठाण्यात निंबा शिरसाठ नामक फिर्यादीच्या सांगण्यावरून खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणात पीडित महिलेला अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत गेले. आणि या सर्व प्रकरणाला अचानक एक वेगळेच वळण आले. बलात्कार केल्याचा पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला. त्याच पद्धतीने उच्च न्यायालयात देखील गैरसमजुकीतून आरोप प्रत्यारोप झाल्याचे सांगण्यात आले आणि संपूर्ण प्रकरण गुंडाळण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा संपूर्ण विषय खरंतर संशयाच्या भोऱ्यातच आहे. कारण नग्न अवस्थेतील आक्षेपार्ह व्हिडिओत अण्णा मोरे आणि पीडित महिलेचा असल्याचे बोलले जात होते. तर मग व्हिडिओ दाखवत पैशाची मागणी करत असल्याबाबत निंबा शिरसाठ या व्यक्तीच्या सांगण्यावरून कसा बरं खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला. यावर देखील अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेले पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे आणि गंगापूरचे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यासह श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णा मोरे, मोरे यांची तिन्ही मुले चंद्रकांत, नितीन व गिरीश, पीडित महिला आणि इतर सर्वांचीच एसआयटी मार्फत चौकशी केल्यास धक्कादायक गोष्टींचा खुलासा होईल असे संभाजी ब्रिगेडने सांगितले आहे. तसेच, येत्या काळात न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या वाटेल तसं कायद्याला आपल्या हाताच्या खेळण्याप्रमाणे खेळवणाऱ्या गुन्हेगारांना शासन होत नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाच्या आंदोलनातून या घटनेचा पाठपुरावा केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यावेळी विशेष माध्यमांच्या पत्रकारांना देखील मिळाली लाखोंची खैरात – खरंतर कायद्याचा वाटेल तसा खेळ करण्याची मानसिकता व हिंमत पैशापुढे कमजोर झालेल्या माध्यमातील काही पत्रकारांमुळेच झाल्याचे नाकारता येणार नाही. वाटेल तेव्हा आणि वाटेल तो गुन्हा करायचा त्यावर आवाज उठवला तर तक्रारदारा विरोधात षडयंत्र रचून त्यात त्यालाच गुंतवायचं. मात्र, या सर्व घटनांमध्ये न्यायापर्यंत पोहोचवणाऱ्या व सत्य कथन व प्रसारण करणाऱ्या पत्रकारांनी प्रामाणिक कर्तव्य बजावले तर कुठल्या पुढारी, पोलीस आणि गुन्हेगारांचे चुकीचे काम करायची हिंमत होणार नाही. परंतु दुर्दैवाने सारिका सोनवणे व अण्णा मोरे यांच्या कथीत बलात्कार प्रकरणात नाशिक मधील विशेष माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलीस अधिकारी व गिरासे नामक व्यक्तीच्या माध्यमातून लाखो रुपयांची खैरात वाटण्यात आल्याची चर्चा या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने सुरू आहे. खरंतर पाटीतील या सडक्या कांद्यांना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी चर्चा सध्या सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे आणि नाव न छापता या बातमीचा मागोवा घेणाऱ्या काही माध्यमांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या दाबलेल्या आवाजाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. आत्तातरी गृहखात्याने या प्रकरणामध्ये सखोल आणि पारदर्शी तपास करून नाशिकच्या आसारामला गजाआड करण्याची मागणी होत आहे.





