५० रुपयांच्या आवर्ती ठेव योजनेचे केले ९ लाख ! - CHECKMATE NEWS
क्राईम

५० रुपयांच्या आवर्ती ठेव योजनेचे केले ९ लाख !


पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्याचा प्रताप उघड !
नाशिक : सिडको परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये डाक सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या संशयिताने आपल्या पदाचा गैरवापर करीत पोस्ट ऑफिसला लाखो रुपयांना चुना लावत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयिताने अशा प्रकारे अजूनही काही उपद्व्याप केलेले आहे का याचाही पोलीस शोध घेत आहे.
           फास्ट मनी आणि लवकर श्रीमंत होण्याच्या नादात कोण काय करेल याचा भरोसा नाही. मात्र, अल्पावधी मध्ये पैसे कमविण्याचा प्रयत्न अंगाशी आल्यास काय होऊ शकते याचा विचार काही लोक करीत नाही. आणि होत्याचे नव्हते करून बसतात. अशाच पद्धतीने पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करीत पोस्ट ऑफिसला चुना लावल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याच्या या कारनाम्यामुळे त्याच्या नोकरीवर देखील गदा येऊन ठेपली आहे.
           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सचिन विठोबा बोरकर हा सिडको पोस्ट ऑफिस मध्ये डाक सहाय्यक या पदावर कार्यरत आहे त्याने दि. २९ मार्च २०१६ ते २१ एप्रिल २०२२ पर्यंत त्याच्या व पत्नीच्या नावाने पन्नास रुपयाची आरडी (आवर्ती ठेव योजना)करून त्यात खाडाखोड करीत पाच हजार रुपये प्रति महिना दाखवून ९ लाख ३६ हजार ७८० रुपयाची पोस्ट ऑफिसची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोस्ट ऑफिसचे सहाय्यक अधीक्षक गोपाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे अधिक तपास करीत आहेत

Translate »
error: Content is protected !!