माजी नगरसेवक आणि मनसे शहराध्यक्षांच्या पत्नीची सोनसाखळी लंपास !
एका तासात सोनसाखळी चोरीच्या चार घटना ! शहर पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान !पोलीस सुस्त, चोरटे मस्त अशी पोलीस दलाची अवस्था !
नाशिक : दिवाळी सणाचा उत्साह सरताच सोनसाखळी चोरटयांनी आपले डोके वर काढले आहे. अंबड, इंदिरानगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या एका तासाच्या अवधीत चार महिलांच्या गळ्यातील जवळपास सव्वादोन लाखांचे सौभाग्याचे लेणे अज्ञात सोनसाखळी चोरांनी ओरबाडून नेले आहे. या घटनांमुळे सोनसाखळी चोरांनी एकप्रकारे शहर पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. या सोनसाखळीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा शहरातील महिलावर्गामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सोनसाखळीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आले असले तरी पोलिसांच्या हाती सोनसाखळी चोरांचे कुठलेच धागेदोरे लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि कविता गणेश डवारे, ३६, रा. गजानन चौक, शांतीनगर, जुने सिडको यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या बुधवार दि. ६ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास या पायी जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून सुंदरबन कॉलनी रोडच्या दिशेने पळून गेले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये शृंखला सुदाम कोंबडे, ३९, रा. शिवनेरी भवन, कोंबडी गल्ली, पाथर्डीगाव, या बुधवार दि. ६ रोजी संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर नांगर येथील निळकंठेश्वर शिव गुरुदेवदत्त संस्थान समोरून जात असताना दुचाकी वरून आलेल्या अज्ञात तिघा सोनसाखळी चोरांनी ४५ हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळून गेले. तसेच, तिसऱ्या घटनेमध्ये सविता अरुण पळसकर, ६७, रा. कमोद नगर, इंदिरानगर, नाशिक या बुधवार दि. ६ रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास कमोदनगर येथील महिला बॅंकेसमोरून पायी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरटयांनी ४५ हजार रुपये किंमतीचे १८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी सोनसाखळीची घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. फिर्यादी वर्षा संजय ठाकूर, ४३, रा. सुचिता नगर, नाशिक या बुधवार दि. ६ रोजी संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास इनराईस हॉटेल बाय सयाजी, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून घरी पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघा सोनसाखळी चोरटयांनी गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने खेचून साईनाथ चौफुलीच्या दिशेने पोबारा केला. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका, इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका दुचाकीवरून ट्रिपल सीट चोरटे शहरात सोनसाखळी चोऱ्या करून आपली दहशत पसरवीत असताना दुसरीकडे पोलिसांची कुठेही नाकाबंदी झाल्याचे चित्र दिसून आले नाही. भर चौकात चोरटे कायद्याची पायमल्ली करून ट्रिपल सीट फिरताना एकाही पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना हे चोरटे दिसून आले नाही का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माजी नगरसेवक आणि मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या पत्नी शृंखला कोंबडे यांना देखील या सोनसाखळी चोरट्यांचा दणका बसला आहे. त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरटयांनी लंपास केली आहे. त्यामुळे चोरट्यांना शहरात कोणाचेही भय उरले नसल्याचे दिसत आहे. आता या सोनसाखळी चोरांविरोधात मनसे रस्त्यावर उतरून आवाज उठवत पोलिसांची झोप उडवणार का असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जात आहे.





