अनैतिक संबंधाच्या कारणातून अपहरण करून युवकाची हत्या !
अपहरण झालेल्या युवकाचा मृतदेह सापडला !करंजाळी शिवारातील सावळघाटात संशयितांनी फेकला होता मृतदेह !
नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून युवकाचे अपहरण करत त्याचा घातपात केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी एका महिलेसह चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या युवकाला मारहाण करून पेठ शिवारातील करंजाळी जवळील सावळ घाटात फेकल्याची माहिती दिली होती. सध्या या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शोध कार्य सुरु करत दुपारी मृतदेह शोधून काढला. संशयितांनी युवकाचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह पेठ शिवारातील दरीत टाकला होता.

श्रीकांत भीमराव उबाळे, २२, रा. वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक मूळ रा, वांगी रोड, लोकप्रिय नगर, परभणी या युवकाचे म्हसरूळ येथील कलानगर परिसरातील एका महिलेशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागली होती. याबाबत त्याने पाळत ठेवत त्यांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. यामुळे संताप झालेल्या पतीने आपल्या मित्रांच्या मदतीने सोमवार दि. १० रोजी कलानगर परिसरात रिक्षातून त्याचे अपहरण करीत त्याला पेठरोडच्या दिशेने घेऊन जात करंजाळी परिसरात त्याला मारहाण केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे म्हसरूळ पोलिसांनी संशयित दीपक कुंडलिक काकडे, २६, रा. कलानगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड, पंचवटी, सविता कुंडलिक काकडे, ४५, चंद्रकांत नारायण कुलकर्णी, ५२, आणि राहुल अशोक शेळके, ३०, रा, गौरी पटांगण, गोदाघाट, पंचवटी यांना ताब्यात घेत अटक केली होती. या संशयितांना सोमवार दि. १७ रोजी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

पोलीस कोठडी मिळाल्यानंतर संशयितांकडे चौकशी केली असता संशयितांनी श्रीकांत उबाळे याचे अपहरण करून त्याला पेठ शिवारातील करंजाळी जवळील सावळघाटात फेकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी संशयितांना घेऊन सोमवारी रात्रीच्या सुमारास सावळघाट गाठले. यावेळी मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने पोलिसांनी नेमके ठिकाण बघून पुन्हा माघारी फिरले. त्यानंतर मंगळवार दि. १८ रोजी सकाळी पुन्हा म्हसरूळ पोलिसांचे पथक, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक, होमगार्डसह घटनास्थळी पोहचले. यावेळी ग्रामीण पोलिसांचे पथक देखील मदतीसाठी सावळघाट परिसरात दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने घाटातील दरीमध्ये श्रीकांत उबाळे याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते. सकाळपासून शोधकार्य सुरु केल्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान श्रीकांत याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिस पथक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या अडचणीतून मार्ग काढत मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.





