युवकाचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

युवकाचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय !


महिलेसह चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात !
पेठ शिवारात निर्जनस्थळी मारहाण करत घातपात केल्याचा संशय !

नाशिक : पंचवटी परिसरातील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील एका युवकाचे अपहरण करून त्याचा घातपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हि घटना अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पीडित युवकाचे गेल्या सोमवारी अपहरण करून त्याला पेठ तालुक्यातील निर्जनस्थळी नेवून मारहाण करण्यात आली आहे. मात्र, अदयाप पोलिसांना अपहरण झालेल्या युवकाबाबत संशयितांकडून योग्य माहिती मिळालेली नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, एका महिलेसह चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

           याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वज्रेश्वरी झोपडपट्टीतील एका युवकाचे म्हसरूळ येथील कलानगर परिसरातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागली होती. याबाबत त्याने पाळत ठेवत त्यांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. यामुळे संताप झालेल्या पतीने आपल्या मित्रांच्या मदतीने सोमवार दि. १० रोजी रिक्षातून त्याचे अपहरण करीत त्याला पेठरोडच्या दिशेने घेऊन जात त्याला मारहाण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान हा युवक हरविल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मिसिंगच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत युवकाचे अपहरण करून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान पंचवटी पोलिसांनी याबाबत एका महिलेसह चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांना म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. लवकरच या संशयितांना अटक करून अपहरण करण्यात आलेल्या युवकांसोबत काय केले याचा उलगडा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पोलिसांनी ताब्यात घेतलेले सराईत गुन्हेगार आहे. यातील महिलेसह एका संशयितांवर मुलांचे अपहरण करण्याचे गुन्हे दाखल आहे. तर एका संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या सराईत गुन्हेगारांनी अपहरण केलेल्या युवकाचा घातपात केला असल्याचा अंदाज सध्या पोलिसांनी वर्तविला असून, त्यादिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. 

Translate »
error: Content is protected !!