चोरट्यांचे पोलीस प्रशासनाला खुले आव्हान !
चोख पोलीस बंदोबस्त असतांना पाच लाखांचे दागिने केले चोरटयांनी लंपास !
नाशिक : पंचवटी परिसरातून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये निघालेल्या जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये चोरटयांनी आपला चांगलाच हात धुवून घेतला आहे. यामध्ये जवळपास पाच लाखांपेक्षा अधिकच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरटयांनी डल्ला मारला आहे. यामध्ये अनेकांचे मोबाईल देखील चोरी झाले आहे. मात्र, नेहमीप्रमाणे मोबाईल चोरीऐवजी गहाळ झाल्याचे अर्ज घेण्यात आले असल्याची माहिती काही तक्रारदारांनी दिली असल्याने त्याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शहरात चोरटे लपून छपून नाहीतर थेट पोलिसांच्या बंदोबस्तात चोऱ्या करू लागल्याने नागरिक दहशतीखाली आले आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये देखील नागरिक स्वतःला आता असुरक्षित समजू लागले आहे. त्यामुळे पोलीस आता फक्त सोशल मीडियावरच उरले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मंगळवार दि.. १५ रोजी तपोवन ते सीबीएस या मार्गावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दीड हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी यासह वाहतूक पोलीस तसेच, एसआरपीएफ आणि राईट कंट्रोल पोलीस देखील तैनात केले होते. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पोलिसच पोलीस दिसून येत होते. मात्र, इतका मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये देखील अनेक चोरटयांनी थेट पोलिसांना आव्हान देत अनेकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या आहे.
याबाबत केशव पंढरीनाथ ढोली, ५९, रा. वावरे नगर, कामटवाडे, अंबड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दि. १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील ३०हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली. तसेच सौरभ देवचंद महाले यांची ६० हजार रुपये किंमतीची २ ग्रॅम सोन्याची चैन आणि सीमा माधव पिंगळे या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची २ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण १ लाख ५० हजार रुपयांच्या सोन्यावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर ज्ञानेश्वर कारभारी शिंदे, ५५, रा. वनसगाव, निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपोवन परिसरात शांतता रॅली साठी आलेले असताना अज्ञात चोरटयांनी फिर्यादीसह अन्य सात महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील जवळपास १३ तोळे वजनाचे ३ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर असताना देखील चोरटयांनी चोऱ्या करून एकप्रकारे पोलीस प्रशासनाला खुले आव्हान दिले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपन्न झालेल्या श्रीराम आणि गरुड रथ यात्रेमध्ये २० महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे सौभाग्याचे लेणे चोरटयांनी लंपास केले होते. तसेच, पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकातील कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लंपास केली होती. यासह अनेक गुन्ह्यांची उकल होणे बाकी असतानाच पुन्हा एकदा चोरटयांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये चोऱ्या करून पोलिसांना आव्हान दिले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट एक आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असलेले मधुकर कड हे चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.





