सराईत गुन्हेगाराने पोलिसाला भोसकले ; नाशिकमध्ये पोलीस असुरक्षित !
पंचवटी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने सामन्यांमध्ये दहशतीचे वातावरण !
नाशिक : पंचवटी परिसरातील युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अपहरण आणि प्राणघातक हल्ल्यांच्या विविध घटनांनी पंचवटी हादरली आहे. गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतवरावर थेट पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करीत चाकू पोटात भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विविध ठिकाणी घडलेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे पंचवटी पोलिसांचा कारभार आणि वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आतातरी पोलीस आयुक्तांनी या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देऊन भाकर फिरवून दबंग अधिकाऱ्यांकडे पोलीस ठाण्यांचा कारभार देणे गरजेचे आहे. जेणे करून पोलीस प्रशासनामध्ये आलेली मरगळ दूर होऊन वाढलेल्या गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होईल.
रविवार दि. २९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रोहित अनिल माळी, २८, रा. अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगला जवळ, पंचवटी, नाशिक आणि त्याचे मित्र अथर्व सानप, आदित्य भामरे, प्रशांत पाटील आणि सचिन निकम यांच्यावर संशयित उमेश चांडोले, वैभव उर्फ नारायण भडांगे, विशांत उर्फ काळु भोये रा. बिडी कामगार नगर आडगाव नाशिक आणि त्यांच्या सोबत असलेल्या आठ ते नऊ संशयितांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करीत रोहित माळी या युवकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच गुन्हेगारांनी पुन्हा आपले डोके वर काढत तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक हल्ले केले आहे. यामध्ये भर रस्त्यात फिल्मीस्टाईल पद्धतीने चाकू हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराने चाकू हल्ला करीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची भयानक आणि संतापजनक घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे, ५७, रा. धात्रक फाटा, नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनवणे हे शुक्रवार दि. ४ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास दिंडोरी नाक्यावरून घरी जात होते. यावेळी दिंडोरी नाका येथील गीता हार्डवेअर समोर संशयित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव उर्फ गटया, रा. अवधूत वाडी, पंचवटी हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. यावेळी सोनवणे यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गटयाने मला सोड नाहीतर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देत थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसला आणि हाताला झटका देत पळून जाऊ लागला. मात्र, सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता थेट संशयितांचा पाठलाग करून त्याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून सोनवणे यांनी तात्काळ रुग्नालयात जाऊन उपचार सुरु केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये अनिल सुभाष चव्हाण याला अंबिकानगर झोपडपट्टी येथून रिक्षात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या संशयितांनी तुला जास्त माज आला आहे, तुझा विषयच संपवतो असे म्हणत शिवीगाळ करीत त्याचे अपहरण केले. अपहरण करून संशयित दिगंबर वाघ, रोहिदास ब्राम्हण आणि त्याच्या इत्तर साथीदारांनी सुभाष याला गिरणारे येथील खंडोबा मंदिर परिसरात नेवून दिगंबर वाघ याने कोयत्याने दोन्ही पायावर वार करून पाय तोडले आणि रोहिदास ब्राम्हण याने दांडक्याने गंभीर मारहाण करीत जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, जखमी अवस्थेमध्ये पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टी जवळ असलेल्या पाटाजवळ आणून फेकून दिले.
तर तिसऱ्या घटनेमध्ये किरण मधुकर सोनवणे, २७, रा. त्रिमूर्ती नगर, हिरावाडी रोड, पंचवटी हे कमॉनगर येथे उभे असताना संशयित रामेश्वर, ओम (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) आणि त्यांचा इतर साथीदारांनी येऊन तुम्ही माझा मित्र रितेश पिंटू पवार याला मारहाण का केली याचा जाब विचारून थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी जीव वाचविण्यासाठी किरण हा रस्त्याने पळू लागला असता त्याचा फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने किरणच्या पाठीवर आणि खांदयावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पंचवटी परिसरात गुन्हेगारांचे राज्य असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर आपल्या स्वयंघोषित नेत्यांचे फोटो आणि त्याखाली अनेक संशयित आपले फोटो लावून एकप्रकारे सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रकाराकडे पंचवटी पोलीस सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण यातील अनेक संशयितांचे अवैध धंदे असून त्यातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते जात असल्याने पोलीस डोळेझाक करीत असल्याची चर्चा पंचवटी परिसरात रंगली आहे. अनेक गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत रस्ते अडवून बेकायदेशीर कार्यक्रम करीत आहे. आणि पंचवटी पोलीस मात्र, फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सध्या नाशिकमध्ये सुरु असलेले खुनाचे सत्र, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, घरफोड्या, वाहने चोरी, जबरी लूट, प्राणघातक हल्ले, गोळीबार या घटनांच्या सुरु असलेल्या मालिका बघून नाशिकची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु असल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारीचा पॅटर्न म्हणून एकेकाळी बिहारकडे बघितले जायचे. मात्र, सध्या नाशिक पॅटर्न राज्यात गाजू लागला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गुन्हा घडल्यानंतर संशयितांना पकडणे म्हणजेच पोलिसिंग असल्याचा समज सध्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे. मात्र, गुन्हे घडूच नये यासाठी पोलीस प्रशासन असते याचा विसर पडल्याचे देखील दुर्दैवी चित्र घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे दिसून येत आहे.





