चुकीला माफी नाही ; पोलीस दल शिस्तप्रिय होते आणि राहणार !
पोलीस हवालदार योगेश ढमाले निलंबित !
नाशिक : पोलीस दल हे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाते. मात्र, याच पोलीस दलात काही झारीचे शुक्राचार्य देखील काम करीत असून, पोलीस दलाच्या शिस्तीला गालबोट लावण्याचे काम करीत आहे. मात्र, अशांना मुजोर कर्मचाऱ्यांना दणका देत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी थेट एका कर्मचाऱ्याला निलंबित करून चुकीला माफी नाही हे दाखवून दिले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कायम शांत आणिक संयमी दिसणाऱ्या पोलीस आयुक्तांनी अशाप्रकारे कडक पाऊले उचलण्याने प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर कामचुकार कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार संतोष बालाजी गंजी, ५३, रा. मुळेगाव रोड, जि. सोलापूर हे रविवार दि. २९ रोजी नाशिकमध्ये कामानिमित्त आले होते. मात्र, त्यांची बॅग चोरीला गेली म्हणून ते तक्रार देण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात गेले. मात्र, येथील पोलीस हवालदार योगेश जालींदर ढमाले यांनी गंजी यांना तुम्ही शालिमार येथे जा आमचे कर्मचारी तेथे येतील असे सांगत त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, गंजी हे दोन तास शालिमार येथे उभे राहिले मात्र, कोणीच पोलीस कर्मचारी आले नाही म्हणून पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी ढमाले यांना आपण दोन तासांपासून शालिमार येथे उभे होतो. मात्र, पोलीस आले नसल्याचे सांगताच ढमाले यांनी तुझी बॅग काही सापडणार नाही असे सांगत गंजी यांच्या कानशिलात मारली.
अचानक झालेल्या अशा प्रकाराने भेदरलेल्या गंजी यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठत आपबिती कथन केली. यावर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता चौकशी दरम्यान त्यांना तक्रारदारास सौजन्याची वागणूक न देता तक्रार घेण्याऐवजी त्यांच्याशी विनाकारण हुज्जत घालत, उर्मटपणे वर्तन केल्याचा आक्षेप ठेवून तसा अहवाल वरिष्ठाना पाठवला. यावर पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस हवालदार योगेश ढमाले याला निलंबित करण्याचे आदेश देत पोलीस दल शिस्तप्रिय होते आणि राहणार असल्याचा संदेश संपूर्ण पोलीस प्रशासनाला दिला आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षक मारहाण प्रकरणाची होणार नव्याने चौकशी – यापूर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील वृंदावन गीते आणि रवींद्र साबळे यांनी सिन्नर फाटा येथे ३० जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पानटपरीवर आलेले शिक्षक रमेश कवडे आणि त्यांचे शालक जालिंदर उगले यांना बेदम मारहाण करीत थेट ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, कवडे यांना दुचाकी चालविता येत नसून ते मद्यपान देखील करीत नव्हते. तरी देखील चुकीच्या पद्धतीने कारवाई केली होती. याबाबत कवडे यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. मात्र, या तक्रारीची दखल घेत यामध्ये हे दोघे कर्मचारी दोषी आढळून आले होते. तरी त्यांना फक्त नागरिकांसोबत गैरवर्तन केले म्हणून लेखी ताकीद देऊन सोडण्यात आल्याने तक्रारदाराच्या तोंडाला एकप्रकारे पाने पुसल्याची चर्चा सुरु झाली होती. या प्रकरणाची देखील पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





