महिला सक्षमीकरण महत्त्वाचे : अजित पवार
जन सन्मान यात्रेला महिलांचं मोठ्या प्रमाणात समर्थन !अजितदादांनी शेतकरी, महिला आणि पैठणी साडी कामगारांशी साधला संवाद !
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड, लासलगाव आणि येवला मतदारसंघातून पुढे गेली आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. अजित पवारांना महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. महिला त्यांचा हात धरून त्यांचे आभार मानत होत्या. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
३३ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेले अजित पवार हे सक्षम प्रशासक म्हणून ओळखले जातात आणि विविध विकास प्रकल्पांचे श्रेय त्यांना जाते. महिला आणि शेतकऱ्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकला. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना ही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातील लाखो भगिनी, माता आणि मुलींच्या जीवनात कशी बदल घडवणारी ठरेल हे अधोरेखित केले. गरीब महिलांसमोरील आव्हाने आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आश्वासन दिले की योजनेचा पहिला हप्ता महिलांना १७ ऑगस्ट रोजी मिळेल. योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, मी ही यात्रा सुरू करण्यापूर्वी दोन महिन्यांच्या हप्त्यासाठी ६ हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राज्यातील विरोधकांचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, योजना पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राकडे पुरेसा निधी आहे.
त्यांनी आगामी निवडणुकीत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले, ते म्हणाले, पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही ही योजना पुढे चालू ठेवू शकू अन्यथा, विरोधक ती बंद करू शकतात. म्हणून, मी तुम्हाला आमच्यासाठी मतदान करण्याची विनंती करतो. महायुती सरकारने महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी पिंक- ई-रिक्षा योजना, मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी लेक लाडकी योजना, ज्यात तिला १८ वर्षे वयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते, अशा अनेक महिला केंद्रित योजना राबवल्या आहेत.
यात्रेत अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी यात्रा काढण्याच्या आणि महिला, शेतकरी, तरुण आणि इतर घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सुनील तटकरे म्हणाले, माझ्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मी अजितदादांचं झालं तेवढं महिलांनी कोणाचंही एवढं स्वागत केल्याचे पाहिले नाही. कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढलेल्या या यात्रेला राज्यातील आगामी निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहे.





