तीन शाळकरी विद्यार्थ्यांना फेकले विहिरीत !
प्रसंगावधान राखत स्वतःसह अन्य दोघांना वाचवले !
नाशिक : सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विहिरीत तीन शाळकरी विद्यार्थ्यांना विहिरीत फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून यातील एका चिमुरड्याने स्वतःसह इतर दोघांचा जीव वाचविण्यात यश मिळविले आणि या धक्कादायक घटनेला वाचा फुटली. याबाबत सिन्नर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर दोघांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांना जीवे मारण्यामागे नेमका काय उद्देश होता याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्वतःसह इतर दोघांचा जीव वाचवणाऱ्या चिमुरड्याच सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मानवी विकृतीचे अत्यंत घृणास्पद, अमानुष व तितकेच संतापजनक कृत्य नाशिकच्या पळसे जवळील वडगाव पिंगळा येथे उघडकीस आले आहे. एक संतापजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. बुधवार दि. १८ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अथर्व संतोष घुगे, वरद संतोष घुगे आणि आदित्य योगेश सानप हे दहा ते तेरा वर्ष वयोगटातील मुले खेळत होती. यावेळी त्यांच्या ओळखीच्या संशयित अमोल रामनाथ लांडगे याने तिघांना सांगितले की, जवळच असलेल्या विहिरीजवळ जा आणि तेथे असणाऱ्या दोघांकडून कासव घेऊन या आणि मला द्या असे सांगितले.
कासव आणण्यासाठी तिघे चिमुरडे विहिरीच्या दिशेने गेले. विहिरीजवळ पोहोचल्यानंतर तेथे असलेल्या संशयित विक्रम नारायण माळी, साईनाथ शिवाजी ठमके रा. वडगाव पिंगळा, ता. सिन्नर, जि. नाशिक आणि अमोल रामनाथ लांडगे या तिघा संशयितांनी त्या तीन लहान मुलांना तुडुंब भरलेल्या विहिरीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. विहिरीत पडलेले तीनही मुले जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. यावेळी यातील एकाने प्रसंगावधान राखत विहिरीत असलेल्या मोटारचा दोरखंड पकडून ठेवला आणि सर्वप्रथम स्वतःला स्थिर करत सुरक्षित करून घेतले. आणि त्यानंतर दोराच्या सहाय्याने विहिरीत जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करत सुरक्षित जवळ घेत दोरीच्या सहाय्याने विहिरी बाहेर निघत आपला जीव वाचवला.
तीनही मुलं घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड दहशतीत आणि भीतीच्या सावटाखाली कसेबसे ओल्या चिंब अंगाने घरी पोहोचले. मात्र, घरी काही सांगितले तर उगाच घरचे रागावतील म्हणून घरात घडलेला प्रकार न सांगताच चुपचाप बसून राहिले. मात्र, ओल्या कपड्यांमुळे घरच्यांना संशय आला आणि त्यांनी तिघांची विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी भेदरलेल्या अवस्थेत असलेली मुलं घाबरून रडू लागली व त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला आणि मग या संपूर्ण विषयाला वाचा फुटली. तीनही मुलांच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकरणाविषयी पांढुर्ली पोलीस चौकी व सिन्नर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत सिन्नर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तीनही मुलांनी केलेल्या वर्णनाच्या आधारे संशयीतांचा शोध घेत संशयित अमोल लांडगे याला ताब्यात घेत अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी त्याच्याकडे चौकशी सुरू असून फरार झालेल्या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मुलांना मारण्यामागे नेमका काय उद्देश होता. याबाबत पोलीस तपास करत आहे. मात्र गावकऱ्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयीतांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.





