पोलीस आयुक्त ‘आपल्या दारी’ आणि हाकेच्या अंतरावर तुंबळ हाणामारी !
पोलीस आयुक्तांसमोर नागरिकांनी मांडल्या गुन्हेगारी
च्या समस्या ! मद्यपी आणि टवाळखोरांचा मोठा त्रास : चौकाचौकांमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस !पोलीस गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी असल्याच्या तक्रारी !
नाशिक : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पोलीस आयुक्त आपल्या दारी उपसक्रमासाठी पंचवटी परिसरात आले होते. पंचवटी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या तक्रारी नागरिकांकडून ऐकून घेत असतानाच हाकेच्या अंतरावरील चौकात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करून पोलिसांकडून कुठलाही तपास केला जात नसून, गुन्हेगार मोकाट असल्याचा गौप्यस्फोट देखील महिलांनी केला.

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही आठवड्यात खून, प्राणघातक हल्ले, पोलीस अधिकाऱ्यांवर सराईत गुन्हेगारांकडून होणारे प्राणघातक हल्ले, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, जबरी लूट, दुचाकी-चारचाकी चोरी, हाणामाऱ्या आणि हत्यारे घेऊन गुन्हेगारांचा धाक शहरवासीयांवर कायमच राहिला आहे. याच दरम्यान, पंचवटीतील कृष्णनगर उद्यान येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २ रोजी सकाळी अकरा वाजता ‘पोलीस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवत करण्यात आली. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना विविध सुरक्षा उपाय आणि पोलिसांच्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले. पण, याच उपक्रमाच्या दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेशवाडी पोस्ट ऑफिस समोर किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारीची घटना घडली. पानटपरी चालक आणि काही युवक यांच्यात किरकोळ वादावरून जोरदार हाणामारी झाली. यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये दहशत पसरली. यावेळी काही नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली आणि मारहाणीत सहभागी असलेल्या पानटपरी चालक आणि काही संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली.
तथापि, हे लक्षात घेतल्यास, पोलीस आयुक्तांच्या उपक्रमादरम्यानच अशी घटना घडली, यामुळे नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. ‘पोलीस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली असली तरी याचा कुठलाही अंकुश वाढत्या गुन्हेगारीवर आलेला दिसत नसल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, पाथर्डी परिसरात गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून एका वयोवृद्ध इसमावर युवकांनी हल्ला केल्याची घटना देखील समोर आली आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. पोलिसांवर अधिक दबाव निर्माण झाला असून, गुन्हेगारांची दहशत कायम आहे. नाशिककरांच्या सुरक्षेसाठी आणखी कडक उपाय योजनांची आवश्यकता आहे. पोलिसांनी या प्रकारच्या घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासमोर महिलांनी उद्यानांमध्ये टवाळखोर आणि मद्यपींचा सुरु असलेला उच्छाद तसेच, प्रेमीयुगुलांच्या वाढलेल्या त्रासाबद्दल सांगितले. चौकाचौकांमध्ये तलवारीने केक कापून धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहे. तसेच, दुचाकी चोरी, मारहाण, किरकोळ कारणावरून कोणास सामान्य नागरिकांनी हटकल्यास आपल्या साथीदारांना बोलावून वाद घालण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्ररींचा पाढा देखील नागरिकांनी वाचला. एक महिला आपल्या कुटुंबियांसमवेत हिरावाडी परिसरातून जाताना एका टोळक्याने गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत दुचाकीची तोडफोड केल्याचे सांगत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून देखील सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुठलीच चौकशी करीत नसल्याबाबत तक्रार केल्याने पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, पोलिसांची गस्त नावालाच असल्याचे सांगत गस्त वाढविण्याची मागणी केली.
प्रेमीयुगलांना पोलीस आयुक्तांचा कायदेशीर पाठिंबा – पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या महिलांनी कृष्णनगर, तपोवन येथील राम सृष्टी उद्यानात चालणारे प्रेमीयुगलांचे चाळे त्याचप्रमाणे चारचाकी वाहनात चालणाऱ्या अनैतिक चाळ्यांबाबत अवगत केले. तसेच, आम्ही त्यांना हटकण्यापेक्षा खाकी वर्दी घालणाऱ्यानी हटकल्यास त्याचा फायदा होईल असे सुचविले. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदेशीररित्या आम्हाला त्यांना रोखणे शक्य नसल्याचे सांगत आपली हतबलता दाखवत एकप्रकारे प्रेमीयुगलांना पोलिसांचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. तसेच, चारचाकी वाहनात कोणी चाळे करीत असल्यास त्याबाबत फोटो व्हिडीओ काढून पोलीस व्हाट्सअप नंबरवर पाठविण्याचे आवाहन केल्याने कार्यक्रमास आलेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले.





