पोलीस प्रशासनाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

पोलीस प्रशासनाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन !


एसआयटी किंवा सीआयडी मार्फत दुहेरी हत्याकांडाचा तपास करण्याची मागणी !
संशयित आरोपींना वाचविण्याच्या दृष्टीने तपास केला जात असल्याचा आरोप !
गुप्त माहिती देणाऱ्यांची नावे जाहीर झाल्यानेच हत्याकांड !
          नाशिक : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात रंगपंचमीच्या दिवशी दोघा सख्या भावांची घरासमोरच निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पाच संशयितांना गुन्हे शाखा एकच्या पथकाने अवघ्या पाच तासात अटक केली होती. मात्र, या हत्याकांडामध्ये पोलिसांचा तपास संशयितांना वाचविण्याच्या दृष्टीने चालू असून, पोलिसांनी माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त न ठेवल्यानेच हे हत्याकांड झाले असल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी नाशिकरोड येथे एक तातडीची बैठक घेऊन पोलिसांच्या तपासाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांचे अवैध धंदे चालविणाऱ्या मारेकऱ्यांबरोबर हितसंबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याने नाशिकचे पोलीस प्रशासन निष्क्रिय झाल्याची चर्चा चौकाचौकात सुरु झाली आहे. 

           याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधलेनगर येथील आंबेडकर वाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव, ३२ आणि प्रशांत भगवान जाधव ३० या दोघा भावांची संशयित आरोपी सागर मधुकर गरड, ३२, रा. आंबेडकर वाडी उपनगर नाशिक, अनिल विष्णु रेडेकर, ४०, रा. उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक, सचिन विष्णु रेडेकर, ४४, रा. गायत्री नगर, पुनारोड नाशिक, अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे, २६, रा. सर्वेश्वर चौक, नविन सिडको उत्तमनगर, नाशिक, योगेश चंद्रकांत रोकडे, ३०, रा. आंबेडकर वाडी, उपनगर नाशिक यांनी पूर्व वैमन्यासातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणून धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेने रंगपंचमीच्या सणाला चांगलेच गालबोट लागले होते. शहरात सुरु असलेल्या खुनांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नाशिककरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

            पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नसल्याने आंबेडकरी जनतेने सोमवार दि. ३१ मार्च रोजी संध्याकाळी नाशिकरोड परिसरातील देवी चौकातील बौद्ध विहार येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये पोलीस प्रशासन संशयित आरोपीना सहकार्य करीत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, पोलिसांनी ज्या पद्धतीने संशयितांना तात्काळ अटक केली ती देखील संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना संशयित आरोपींच्या अवैध धंद्यांची माहिती दिली असता माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त न ठेवल्याने हे हत्याकांड झाल्याचा आरोप करीत पोलिसांचे हप्ते चालू असल्याने संशयितांना मदत केली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. संशयितांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून फक्त लोखंडी रॉड आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे. मात्र, जप्त केलेला कोयता हत्या करताना वापरला गेला नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. संशयितांनी हत्याकांड करून कपडे बदलले होते. मात्र, पोलीस त्या दिशेने पोलीस तपास करायला तयार नव्हते. मात्र, मित्रपरिवाराने दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांचा तपास दिशाहीन करणारा आणि संशयितांच्या पथ्यावर पडणारा असल्याने दुहेरी हत्याकांडाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करण्याच्या मागणीसाठी सोमवार दि. ७ रोजी बी. डी. भालेकर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.  
गेल्या वर्षभरापासून नाशिक शहरात कायदा सुव्यवस्थेची घडी चांगलीच विस्कटली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले, गोळीबार, टोळीयुद्ध, जबरी लूट, घरफोडी, दुचाकी-चारचाकी चोरी, भाविकांची लुटमार अशा गंभीर गुन्ह्यांनी पोलीस ठाण्यांमधील रजिस्टर भरू लागले आहे. मात्र, गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. यामुळे सोशल मीडियावर नाशिकच्या पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांच्या तीव्र भावना उमटू लागल्या आहे. शहरभर पसरलेले आणि उघड सुरु असलेले अवैध सामान्य नाशिककरांच्या नजरेस पडत आहे. मात्र, पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसलेले दिसत असल्याने नागरिकांच्या संतापात अजूनच भर पडू लागली आहे. त्यात दोघा भावांच्या हत्याकांडात पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागल्याने यामध्ये गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

Translate »
error: Content is protected !!