बांगलादेशी घुसखोरांना एटीएस कडून अटक ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

बांगलादेशी घुसखोरांना एटीएस कडून अटक !


तीन बांगलादेशी नागरिकांसह स्थानिक नागरिकाला अटक !
नाशिक (सिडको) : नाशिक शहरातील पाथर्डी गाव परिसरात मागील एक ते दीड वर्षापासून अनधिकृत पणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या एका स्थानिक संशयिताला दहशतवादी विरोधी पथकाने इंदिरानगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. बांगलादेशी संशयित केवळ वास्तव्यासाठी नाशिक मध्ये असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर येत आहे. त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह पुरावे आढळलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घातपाताचा संशय यातून स्पष्ट होत नसल्याचे नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
                याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या एक ते दीड वर्षापासून पाथर्डी गावालगत असलेल्या काझीमंजिल येथे बांगलादेशी नागरिक वास्तव्यात असल्याची माहिती दहशतवादी पथकाला मिळाली होती. या पथकाने परिसरात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला असता दोन महिला अंबड परिसरातील एका पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएसने रविवारी (दि. १८) पहाटे तीन वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत सापळा रचला. यानंतर, संबंधित परिसरात तळ ठाेकून आवश्यक त्या फाैजफाट्यासह एटीएसने कारवाई करत एक बांगलादेशी महिला व दाेन पुरुषांना ताब्यात घेत त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली. मात्र, यात काहीही आढळून आले नाही. 
           भारतात घुसखोरी करून नाशिकमध्ये भाडेतत्वावर राहणाऱ्या बांगलादेशी संशयित शागोर मोहंमद अब्दुल हुसेन माणिक (२८), मुस्समत शापला खातून (२६), इति खानम मोहंमद शेख (२७, सर्व रा. काजी मंजील, पाथर्डी गाव, नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांना वास्तव्यासाठी कागद पत्रासह सर्वोतोपरी मदत करणाऱ्या संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२) याला देखील अटक करण्यात आली आहे. या संशयितांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नाशिक युनिटच्या सहायक निरिक्षक योगिता पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पाेलीस ठाण्यात अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
नाशिक जिल्ह्यासह इतर आजूबाजूच्या गावांमध्ये बांधकाम साईटवर अशा प्रकारे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी अशा बांधकाम साईटवर तसेच, आजूबाजूच्या गावांमधे नागरिकांशी संवाद साधून बांगलादेशी नागरिकांचा शोध घेणे गरजेचे आहे. आज जरी यांच्यापासून धोका नसला तरी दहशतवादी कारवाया करणारा सहजासहजी ओळखू येत नाही हेही तितकेच खरे आहे.   

Translate »
error: Content is protected !!