दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या महिलेने घेतला दांपत्याचा जिव !
नाशिक : नाशिकमध्ये गंगापूर रोडवर अपघाताच्या घटनेमध्ये एका वृद्ध दांपत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दारूच्या नशेत चारचाकी वाहन चालविणाऱ्या एका महिलेने हा अपघात केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दारूचे सेवन केल्याचा रिपोर्ट आल्यानंतर तिला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित महिला स्मिता विजय रासकर, रा. रोहित हाईटस, जेहान सर्कल, गंगापूर रोड हि सोमवार दि. २५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपले चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. १५ जे. एम. ००६६ हे दारूच्या नशेत जेहान सर्कलकडून गंगापूर गावाकडे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत होती. दरम्यान गंगापूर रोडवरील सोमेश्वर पेट्रोल पंपासमोर उजव्या बाजूस वळण घेतल्याने गंगापूर गावाकडून दुचाकी क्रमांक एम. एच. जी. डब्ल्यू. ४२९४ वरून येणाऱ्या सुरेश वसंतराव वखारकर, ६४ आणि विद्या सुरेश वखारकर, ६० रा. शारदा सोसायटी, लक्ष्मी नगर, अमृतधाम, पंचवटी यांना जोराची ठोस मारली. हा अपघात इतका भयानक होता कि, यामध्ये वखारकर दांपत्य यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मागून येणारी एक चारचाकी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.
गंगापूर रोड आणि कॉलेजरोड हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक नागरिक पाश्च्यात्य संस्कृतीला विशेष दर्जा देत दिवसासह रात्री मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करीत असतात. त्यामुळे या रोडवर वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. याच गंगापूर रोडवर अनेक बियरबर, हॉटेल्स आणि वाईन शॉपस आहे. त्यामुळे दारूची उपलब्धता देखील कायमच असते. मात्र, याच उच्चभ्रू आणि बखळ पैशांचा माज असलेल्या नागरिकांमुळे सामान्य नागरिकांना आपला नाहक जीव गमवावा लागत असल्याचे दिसत आहे. या रस्त्यांवर भरधाव धावणाऱ्या आलिशान गाड्यांमधून दररोज जणू यमदूत फिरत असावे असे चित्र दिसत असते.
अपघात झाल्यास अपघात करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे कुठलेही कायदे अस्तित्वात नसल्याने याचा मोठा फायदा नागरिकांचा जीव घेणाऱ्यांना होतो. तर दुसरीकडे नाहक आपला जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा त्याच्या हाती काहीच लागत नसल्याचे दुर्दैची चित्र आपल्या भारतात दिसून येते. विशेष म्हणजे दोन लोकांचा जीव घेऊन देखील या महिलेला अद्याप अटक नाही. कारण आपल्या कायद्यात संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालता येईल अशी अनेक कायदे आहेत. त्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्हेगारांना तर अटकच करायची नाही. असा आदेश असल्याने सामान्य नागरिकांना न्याय मिळणे देखील अवघड झाले आहे.





