प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात भाईंची फलकबाजी ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात भाईंची फलकबाजी !


मनपाचा महसूल बुडवून शहराचे विद्रुपीकरण ! 
उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली !

नाशिक : पोलीस आणि मनपा प्रशासन कशा सोयीच्या पद्धतीने काम करतात याचे जिवंत उदाहरण बघायचे झाल्यास शहरभर फिरल्यास दिसून येईल. कारण काल परवा पर्यंत रस्त्याच्या कडेला, उद्यानाच्या भिंतीवर किंवा कॉलनीतील रस्त्यावर लावलेले दोन बाय दोनचे फलक काढून त्यावर असलेल्या व्यक्तीच्या नावानुसार विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून मनपा अधिकारी मर्दुमकी गाजवत होते. तर दुसरीकडे गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखविण्याची भाषा करणारे पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत गेल्याचे दिसत आहे. कारण उच्च न्यायालयाचा अवमान करून शहरभर संशयित गुन्हेगारांनी आपली फलकबाजी सुरु केली आहे. त्यावर कोणीही कारवाई करण्यास धजावत नसल्याने शहरात पोलिसांचे नाहीतर गुंडांचे साम्राज्य असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे गुन्हेगारीचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण नव्हे तर अजून काय असा प्रश्न देखील नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढत्या बेकायदेशीर फलकबाजीमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची सर्व नाशिककरांना कमतरता जाणवत आहे. 

             रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर फलकबाजांना आवर घालण्यासाठी उच्च न्यायालयाने शहर विद्रुपीकरण कायदा लागू केला. यामध्ये बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांविरोधात आणि त्यावर झळकणाऱ्या नेत्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, सध्या या कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्य व्यावसायिक आणि नागरिकांवर उगारण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र शहरभरात दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करायची असल्यास त्याबाबत रीतसर मनपाकडे अर्ज करून त्याबाबतचा कर भरून परवानगी घेण्याची पद्धत आहे. मात्र, सध्या शहरात झळकलेले सर्वच फलक हे विनापरवानगी आणि बेकायदेशीर असल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वात जास्त आर्थिक नुकसान मनपाचे होत आहे. याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्यांनी मनपा आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध विभागीय अधिकाऱ्यांनी लहान लहान व्यावसायिकांचे छोटे छोटे फलक काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. सध्या हे अधिकारी कोणत्या बिळात लपले आहे. याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. 
           तर दुसरीकडे ज्यांच्या हातात शहराची सुरक्षा दिली आहे. ते पोलीस प्रशासन तर गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसू लागले आहे. कारण ज्या पोलीस प्रशासनाने विविध पोलीस ठाण्यात विविध संशयित गुन्हेगारांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. त्यातीलच अनेक संशयित गुन्हेगारांनी संपूर्ण शहरात फलकबाजी करीत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. हे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या विविध पथकातील आणि गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांना दिसत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या याच बोटचेपी भूमिकेचा गैरफायदा उचलत शहरात गुन्हेगारांनी आपले प्रस्थ वाढविण्यास सुरुवात केली आहे. याचा मोठा त्रास सर्वसामान्य नाशिककरांना भोगावा लागत आहे. याकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जातीने लक्ष देऊन शहर फलकमुक्त करून एक आदर्श असा संदेश देणे गरजेचे आहे. 
तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरात गुन्हेगारांवर आपला एक दबदबा निर्माण केला होता. शहरातील सर्व अवैध धंदे बंद केले होते. तसेच, शहरात कुठलेही धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक आणि वाढदिवसाचे फलक लावायचे असल्यास त्याबाबत पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. इतकेच नव्हे तर जाहिरात फलकावर कोणाचे फोटो आणि काय मायना असणार याचा प्रूफ देखील सोबत जोडावा लागत असल्याने शहरात फलक लावण्यास कोणीही धजावत नव्हते. त्यामुळे संपूर्ण शहराने मोकळा श्वास घेतल्याचे नाशिककरांनी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे शहरातील अवैध धंदे बंद ठेवल्याने त्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे देखील सोपे झाल्याचे नाशिककरांनी बघितले असल्याने त्यांना आज तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची कमतरता जाणवत आहे. तर कायदा तोच कायम असताना फक्त अधिकारी बदलला की कारवाईची पद्धत देखील बदलते हे देखील जाणवत आहे. 
शहरात सध्या खून, प्राणघातक हल्ले, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले, अवैध धंदे चालक, खंडणी, मारहाण, जबरी लूट, अत्याचार प्रकरणातील अशा अनेक संशयित गुन्हेगारांचे फलक बिनदिक्कत झळकत आहे. यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांना दिशादर्शक फलक दिसत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अनेक भाविकांना त्यांचे इच्छित स्थळ गाठतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात चुकून नो एंट्रीमध्ये घुसल्यास त्यांची लूटमार ठरलेली आहे. यामुळे नाशिक शहराचे नाव देखील मोठ्या प्रमाणात बदनाम होत आहे. 

Translate »
error: Content is protected !!