चोरट्यांनी केला लाखो रुपयांचा लसूण लंपास ! - CHECKMATE NEWS
क्राईममहाराष्ट्र

चोरट्यांनी केला लाखो रुपयांचा लसूण लंपास !


पंचवटी परिसरात गुन्हेगारीसह चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ !
नाशिक : सध्या लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दर गगनाला भिडले आहे. लसणाच्या दराने बाजार समितीमध्ये तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लसूण जवळपास चारशे रुपये किलो दराने विकत घ्यावा लागत आहे. यामुळे चोरटयांनी आपली वक्रदृष्टी बाजार समितीकडे वळवली असून, साडेतीन लाख रुपयांच्या लसणाच्या अकराशे किलोच्या २२ गोण्या चोरटयांनी लंपास केल्या आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये खासगी सुरक्षारक्षक असताना देखील चोरी झाल्याने येथील सुरक्षारक्षक नेमकी कसली सुरक्षा करीत होते असा प्रश्न संतप्त व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
             याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि तुषार माणिक कानकाटे, ३४, रा. मंडलिक मळा, मखमलाबाद रोड, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दि. १० रोजी दुपारी दोन ते सोमवार दि. ११ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथील गाळा नं. ४० मध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी केली आहे. रात्रीच्या सुमारास या अज्ञात चोरटयांनी बंद दुकानात प्रवेश करून साडेतीन लाख रुपये किंमतीचा अकराशे किलो वजनाच्या २२ लसणाच्या गोण्या चोरटयांनी लंपास केल्या आहे. याबाबत पंचवटी पोलीस अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावर होणारे खून, हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, जबरी लूट, सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी याचा फटका सामान्य नागरिकांसह पोलिसांना देखील बसू लागला आहे. नुकत्याच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच, गुन्हे शोध पथकातील हवालदाराच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी चोरटयांनी केल्याची घटना देखील घडली आहे. या गुन्हेगारी घटनांमुळे पंचवटी पोलिसांचा कारभार कसा चालला असावा हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 
शरदचंद्र पवार मार्केट येथे अज्ञात चोरट्यांच्या टोळक्याने लसणाच्या गोण्या चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच, या लसणाच्या गोण्या दुचाकीवरून घेऊन जाण्यात आल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार दुचाकीवरून लसणाच्या गोण्या घेऊन जात असताना त्यांना हटकण्यासाठी एकही सुरक्षारक्षक या ठिकाणी आणि मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित नव्हता का असाही प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून डायनॅमिक सिक्युरिटी एजन्सीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. शरदचंद्र पवार मार्केट मध्ये १२ सुरक्षारक्षक असून, कांदा बटाटा सेक्शन येथे दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. असे असताना देखील लसणाच्या गोण्यांची चोरी झाल्याने डायनॅमिक सिक्युरिटी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. : निकेत साळवे, सुरक्षा अधिकारी, नाकृउबा समिती 

Translate »
error: Content is protected !!