पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा संशयितांना अटक !
तिघे संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार !
नाशिक : पंचवटी परिसरात पोलीस उपनिरीक्षकावर दगडाने तिघा सराईत गुन्हेगारांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खासगी रुग्नालयात उपचार सुरु आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत असून तिघा संशयितांना शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमन नेमाने, ३१, रा. लामखेडे मळा, तारवाला नगर, पंचवटी हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून सोमवार दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात असताना दिंडोरी रोडवरील विदुयत नगर परिसरात एमएसइबी कार्यालयाबाहेर तीन मद्यपी हातात दगड घेऊन रस्त्यावर धिंगाणा करताना नेमाने यांना दिसले. यावेळी नेमाने यांनी जवळ जाऊन बघितले असता संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील उर्फ सोनू निवृत्ती पगारे, गणेश उर्फ बाटल्या गौतम गायकवाड आणि पियुष उर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे तिघे रा. अवधूत वाडी, फुलेनगर हे होते. यावेळी नेमाने यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले असता संशयित सुनील उर्फ सोनू निवृत्ती पगारे हा म्हटला की, बरे झालं तू आज एकटा सापडला, तुझ्याकडे पाहून घेतो आज असे बोलून त्याने त्याच्या हातातली विट नेमाने यांच्या डोक्यात मारल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला यावेळी पुन्हा गणेश याने कपाळावर आणि नाकावर दगड मारला. तसेच, संशयित पियुष उर्फ ब्लॅकी याने नेमाने यांच्या दुचाकीवरील हेल्मेट उचलून ते नेमाने यांच्या तोंडावर मारण्यास सुरवात केली. यावेळी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी नेमाने यांची संशयितांच्या तावडीतून सुटका केली. अचानक दगडाने हल्ला झाल्याने या हल्ल्यात नेमाने यांच्या तोंडावर गंभीर मार लागल्याने त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यात दोन ठिकाणी टाके पडले आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, आपल्या गुन्हे शोध पथकाच्या टीमला संशयितांच्या मागावर पाठवले असता पोलिसांनी रात्रभर संशयितांचा कसून शोध घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील उर्फ सोनू निवृत्ती पगारे, गणेश उर्फ बाटल्या गौतम गायकवाड आणि पियुष उर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवार दि. १५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांचा कुठलाही वचक शहरातील गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे उघड झाले आहे.





