दहा दिवसात खुनाच्या दुसऱ्या घटनेने सिडको हादरले ! - CHECKMATE NEWS
क्राईम

दहा दिवसात खुनाच्या दुसऱ्या घटनेने सिडको हादरले !


सिडको परिसरात भर चौकात खुन !
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही दिवसांपूर्वी फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने सिडको परिसर हादरला आहे. एकापाठोपाठ एक खून होत असल्याने सिडकोतील कायदा सुव्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खून प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 
           अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवार दि. २८ जून रोजी प्रशांत भदाणे (२५, रा. ओंकारेश्वर महादेव मंदिर स्वामी नगर अंबड) हा रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्वामी नगर परिसरातून जात असताना संशयित आरोपी सुफियान अनिस अत्तार (१८, रा. स्वामी नगर अंबड) आणि विक्की बंटी प्रसाद (२०, रा. माऊली लॉन्स अंबड) यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार हत्याराने प्रशांत भदाणे याची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. या घटनेला दहा दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने सिडको हादरले आहे. 
         अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्त मंदिर बसस्टॉपजवळ असलेल्या देशी दारु दुकानाबाहेर मंगळवार दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गणपत घारे (५०) आणि समोद कौर (३५) हे दोन मद्यपी किरकोळ कारणावरून भररस्त्यात भांडण करीत होते. यावेळी घारे याने पहिले कौर याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर कौर याने घारे याच्या हातातून लाकडी दांडका घेऊन त्याच्यावर हल्ला चढविला. कौर याने याने गणपत घारे याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचे एकामागोमाग एक वार केल्याने घारे याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अनेक नागरिकांनी हा मारहाणीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी धाव घेत संशयित आरोपी कौर याला अटक केली आहे. 
अंबड पोलीस ठाण्याचा कारभार नुकताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी हाती घेतला आहे. त्यांनी अंबड पोलीस ठाण्याची सूत्रे १९ जून रोजी हाती घेतली होती. सूत्रे हाती घेताच आठवडाभरात प्रशांत भदाणे या युवकाच्या हत्येची घटना घडली होती. तर पुन्हा दुसऱ्या आठवड्यात हत्येची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, सिडकोतील शमलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली असल्याची चर्चा सध्या सिडको परिसरात रंगली आहे. त्यामुळे कड यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 

Translate »
error: Content is protected !!