जुना वाडा कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान ! - CHECKMATE NEWS
नाशिक

जुना वाडा कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान !


जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
धोकेदायक वाडे पाडण्याची नागरिकांची मागणी !
नाशिक : जुन्या नाशिकमध्ये असणारा एक जुना वाडा अचानक कोसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाल्याची घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एका रिक्षाचे आणि दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. 
           जुने नाशिक परिसरातील चौक मंडई परिसरातील वजरे रोड परिसरात असणारा एक जुना वाडा मंगळवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. वाड्याचा मोठा भाग हा परिसरात उभ्या असलेल्या एक्सेस क्रमांक एम. एच. १५ जे. के. ०२१२, पल्सर क्रमांक एम. एच. १५ जे. के. ५४२९, रिक्षा क्रमांक एम. एच. १५ इ. एच. १८६६ या वाहनांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 
            चौक मंडई परिसरातील वजरे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून, याठिकाणी अनेक जुने वाडे आहे. या वाड्याचे मालक वाडा मोडकळीस आल्याने याठिकाणाहून निघून गेले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच, वाडा मोडकळीस आल्याने किमान ते उतरवून घेऊन नागरिकांच्या जीवाचा धोका टाळावा असे देखील यावेळी रहिवाशांनी सांगितले आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरमालकांना बोलावून त्यांना वाड्याचा धोकादायक भाग उतरवून घेण्यास सांगणार असल्याची माहिती दिली. अशा धोकादायक वाड्यांकडे आत्तातरी मनपा अधिकारी लक्ष देऊन हे वाडे पाडणार की मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार हे येत्या काळात दिसून येणार आहे. 

Translate »
error: Content is protected !!