दोन लहान मुलींवर भटक्या श्वानांचा हल्ला ! - CHECKMATE NEWS
नाशिक

दोन लहान मुलींवर भटक्या श्वानांचा हल्ला !


भटक्या श्वानांना पकडण्याची स्थानिकांची मागणी !

नाशिक : पंचवटी परिसरात भटक्या श्वानांनी दोन लहान मुलींवर हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात भटक्या श्वानांची दहशत पसरली आहे. याच परिसरात अनेक भाविक देव दर्शनासाठी येत असतात त्यांच्यावर देखील या भटक्या श्वानांनी हल्ला केला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मनपा प्रशासनाने या श्वानांना पकडून या भटक्या श्वानांचा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. १९ रोजी सकाळी अकरा साडेअकरा वाजेच्या सुमारास परी पवन खत्री, १२, रा. नाटकर लेन, पंचवटी आणि ऐश्वर्या प्रवीण पाटील, १०, रा. मालवीय चौक, पंचवटी या दोघी नाटकर लेन परिसरात खेळत होत्या. यावेळी परिसरात असलेल्या पाच ते सहा भटक्या श्वानांनी अचानक परी आणि ऐश्वर्या यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या दोन्ही चिमुरडीच्या हातावर, चेहऱ्यावर श्वानांनी चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी आणि रक्तभंबाळ झाल्या होत्या.

श्वानांनी हल्ला केल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत या श्वानांच्या तावडीतून या लहान मुलींची सुटका केली. या मुलींना अनेक ठिकाणी श्वानांनी चावा घेतल्याने त्यांना तात्काळ रुग्नालयात उपचारासाठी नेण्यात आले. या हल्ल्यामुळे परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गोदाघाट परिसरात देश-विदेशातून आलेले भाविक श्री. काळाराम मंदिर, सीतागुंफा, कार्तिक स्वामी मंदिरात जाण्यासाठी याच नाटकर लेन परिसरातून जात असतात. त्यामुळे हा रस्ता पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो. त्यात या भटक्या श्वानांनी उच्छाद मांडल्याने भाविकांना या परिसरातून जातांना या श्वानांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी देखील या श्वानांनी अनेक भाविकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. तसेच, मनपाने या भटक्या श्वानांना पकडून परिसरातील नागरिकांना भयमुक्त करण्याची देखील मागणी केली आहे.

 


Translate »
error: Content is protected !!