अत्रे अत्रे सर्वत्रेचा खास प्रयोग ३० जुलैस नाशिकमध्ये! - CHECKMATE NEWS
नाशिक

अत्रे अत्रे सर्वत्रेचा खास प्रयोग ३० जुलैस नाशिकमध्ये!


साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी १२५ व्या जयंती निमित्त आयोजन ! 

 

नाशिक – विशेष प्रतिनिधी

यंदाचे वर्ष साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे १२५ वे म्हणजेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष महाराष्ट्र शासन आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे साजरं करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आयोजक म्हणून विकास खारगे (प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग), विभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय) यांनी जबाबदारी उचलली आहे. या उपक्रमांतर्गत ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा अशोक हांडे लिखित व दिग्दर्शित कार्यक्रम मुंबईच्या ‘चौरंग’ या संस्थेतर्फे सादर केला जात आहे.

 

अत्रे अत्रे सर्वत्रे हा कार्यक्रम म्हणजे आचार्य अत्रे यांची संगीतमय जीवन गाथा आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा, त्यांच्या नाटक व चित्रपटातील गाणी, कविता कथा विनोदी भाषणे, विनोदी किस्से आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या माध्यमातून मांडला जातो. शिक्षक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, वक्ते, नाटककार, चित्रपटकार, कथा, पटकथा, संवाद लिहिणारे, नाट्यपदं आणि चित्रपटातील गाणी लिहिणारे निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, संपादक, विनोद, काव्य, साहित्य आणि आपल्या तडाखे बंद आणि विनोदी भाषणांनी महाराष्ट्राला परीचित असलेले आचार्य अत्रे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. राजकारणात उडी घेऊन त्यांनी पुण्याचा विकास केला व पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सेनापतीपद भूषविले आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्र घडवला.

 

आचार्य अत्रे कोण होते? त्यांची विद्वत्ता, वक्तृत्व, राजकीय कर्तृत्व, त्यांनी शालेय अभ्यासक्रमात आणलेले ‘नवनीत वाचनमाला’, पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांचे योगदान, नाटक आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी निभावलेली ऊतुंग भूमिका. आचार्य अत्रे नसते तर कदाचित महाराष्ट्र दिसला नसता, घडला नसता. आचार्य अत्रे यांच्या बद्दल जेवढे सांगावं तेवढं कमीच आहे. हे सर्व नव्या पिढीला कळलं पाहिजे या तळमळीतून लेखक, दिग्दर्शक, गायक, निवेदक अशोक हांडे व त्यांचे चौरंगचे ५० कलाकार हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमासाठी अशोक हांडे यांना आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून संगीत संयोजन महेश खानोलकर यांचे आहे. सार्वजनिक वाचनालय अ. भा. नाट्य परिषद नाशिक शाखा यांचें सहकार्य आहे.

← Back

Thank you for your response. ✨

 

अत्रे अत्रे सर्वत्रेचा प्रयोग हा प्रेक्षकांसाठी संपूर्णपणे विनामूल्य : अत्रे अत्रे सर्वत्रे या कार्यक्रमाचा प्रयोग मंगळवार दिनांक ३० जुलै सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे होणार आहे. तरी दर्दी रसिकांनी याचा लाभ घ्यावा व महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सामील व्हावे असे आवाहन लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे यांनी केले आहे.

 


Translate »
error: Content is protected !!