मुख्य बाजारपेठेतील देहविक्री व्यवसाय बंद करा ! - CHECKMATE NEWS
नाशिक

मुख्य बाजारपेठेतील देहविक्री व्यवसाय बंद करा !


स्थानिक व्यावसायिक आणि सार्वजनिक मंडळाचे पोलिसांना निवेदन !
नाशिक : नाशिकची मुख्य बाजारपेठ म्हणून भद्रकाली परिसराची ओळख आहे. याच परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला भद्रकाली परिसरातील अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. तसेच, बेकायदेशीर लॉजिंगमध्ये हे व्यवसाय वाढत असाल्याने परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहे. या विरोधात स्थानिक व्यावसायिकांनी आणि सार्वजनिक मंडळांनी एकत्र येत भद्रकाली पोलिसांना निवेदन देत अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.
           भद्रकाली परिसर अनेक वर्षांपासून कुंटणखान्यासाठी कुप्रसिद्ध होता. या परिसरात सुरु असलेल्या कुंटखान्यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि व्यावसायिकांना याठिकाणी व्यवसाय करणे अवघड बनले होते. याविरोधात अनेकदा आवाज उठविल्यानंतर भद्रकाली परिसरातील कुंटणखाना पोलिसांनी कायमस्वरूपी बंद केला होता. मात्र, त्यानंतर याठिकाणी देहविक्री करणाऱ्या काही महिलांनी आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या लॉज चालकांना सोबत घेऊन त्यांनी पुन्हा आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेऊन हे लॉजेस बंद केले होते. 
            मात्र, सध्या पुन्हा या परिसरातील लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मुख्य बाजारपेठेत अशा पद्धतीने सुरु असलेले अनैतिक धंदे पोलिसांनी बंद करावे यासाठी नागरिकांनी मंगळवार दि. ८ रोजी एकत्र येत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना निवेदन देत अनैतिक धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच, बेशिस्त रिक्षा चालकांचा वाढता उपद्रव याला देखील आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. 
           निवेदन देताना सुनील लोणारी, श्रीकांत इसे, मयुरेश कोथमिरे, मकसुद अत्तार, श्रीकांत वावरे, गणेश थोरात, नितीन भागवत, राहुल सोनवणे यांच्यासह सत्यम मित्र मंडळ, भद्रकाली व्यापारी मंडळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र उपस्थित होते. लवकरात लवकर हे अनैतिक व्यवसाय बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी उपस्थितांनी दिला आहे.   

Translate »
error: Content is protected !!