उपमुख्यमंत्री अजित पवार काळाराम चरणी नतमस्तक !
नाशिक : नाशिकमध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी काळारामाचे दर्शन घेत पूजाअर्चा करीत संकल्प केला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगला विजय मिळावा आणि महायुतीची सत्ता राज्यात प्रस्थापित होण्यासाठी श्री काळारामास साकडे घातले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिक शहरात दाखल झाली असून, गुरुवारी (दि.८) सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काळाराम मंदिरात येऊन पूजा अर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, क्रीडा राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष रामेश्वर साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ना. अजित पवार यांच्या हस्ते काळारामास पूजा व अभिषेक करून संकल्प करण्यात आला. त्यांच्या नावे मंदिरात वर्षभर एकादशीला अभिषेक केला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षासह महायुतीला चांगला विजय मिळावा यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी पौरोहित्य महंत सुधीर पुजारी, धनंजय पुजारी यांनी केले. यानंतर काळाराम मंदिर ट्रस्टच्या वतीने विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, अजय निकम, शुभम मंत्री, एकनाथ कुलकर्णी यांनी काळारामाची प्रतिमा देऊन पवार यांचा सत्कार केला. दरम्यान, मंदिराच्या पूर्व दरवाजा भागात ढोल ताशांच्या गजरात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी गर्दी केली होती.





