रहिवाशी परिसरात बिबट्याने पाडला बकरीचा फडशा !
रहिवासी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट !
नाशिक : पंचवटीतील माने नगर परिसरात बिबट्याने एका शेळीचा फडशा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्या सोबत घटनास्थळी पाहणी केली. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या ज्या परिसरात आढळून आला आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे आणि शेती आहे. त्यामुळे बिबट्याला शोधण्यात सध्या अडचणी येत आहे.

पंचवटी परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या माने नगर परिसरातील के.के.वाघ एग्रीकल्चर कॉलेज येथे सोमवार दि. १४ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका बकरीला ओढुन नेत तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माजी नगरसेविका प्रियंका माने आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांना घटनेची माहिती कळवली. यावेळी माने दांपत्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी राजेंद्र ठाकरे यांना फोन करून बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
परिसरात राहणारे नारायण तूपसमुंदर यांची बकरी बिबट्याच्या या हल्ल्यात ठार झाली आहे. ज्या ठिकाणाहून बिबट्याने बकरीला उचलून नेऊन दुसऱ्या ठिकाणी बकरीला ठार करत तिची शिकार केली त्या सर्व परिसराची पाहणी माजी नगरसेविका प्रियंका माने, वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी राजेंद्र ठाकरे, नारायण तूपसमुंदर, पप्पू माने, कदम, मयुर शेवाळे यांनी केली. यावेळी माने यांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, माने नगर, धात्रक फाटा, म्हसरूळ, आडगाव या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील केल्या आहे.
वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असता ठिकठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहे. तसेच, ज्या बकरीची शिकार बिबट्याने केली आहे. त्या बकरीचा मृतदेह देखील अधिकाऱ्यांना सापडला आहे. बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असल्याचा अंदाज यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.





