तीन महिने उलटूनही खुनातील आरोपी मोकाटच !  - CHECKMATE NEWS
क्राईम

तीन महिने उलटूनही खुनातील आरोपी मोकाटच ! 


खुनाचा तपास मंदावल्याने मयताच्या नातेवाईकांमध्ये नाराजी !
नाशिक : म्हसरूळ परिसरातील एका वृद्ध महिलेचा दिवसाढवळ्या घरात घुसून विळ्याने हल्ला करीत निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेला तीन महिने उलटले असून, पोलिसांच्या हाती संशयिताचे कुठलेच धागेदोरे अद्याप लागलेले नसून खुनी मोकाट फिरत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. यामुळे पोलिसांचे नेटवर्क कमकुवत झाले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी संशयितांचा माग काढत असल्याची माहिती दिली आहे. 
             दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास याठिकाणी राहणाऱ्या कुसुम सुरेश एकबोटे (८०) या ज्योती गोविंद एकबोटे या मुलीसोबत राहत होत्या. बुधवार (दि.१० जुलै) रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास कुसुम एकबोटे या घरात एकट्या असताना अज्ञात हल्लेखोराने विळ्याच्या साहाय्याने कुसुम यांच्या डोक्यावर आणि छातीवर विळ्याच्या साहाय्याने वार करत खून केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारेकऱ्याने त्यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी खून केला असल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला असून, याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
            खून झाल्यानंतर या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वतीने पाच पथके तयार करून संशयिताच्या मागावर पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांना संशयितांचा कुठलाही माग मिळाला नसल्याने हि सर्व पथके रिकाम्या हाताने परत आली होती. त्यानंतर या खुनाच्या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी खुनातील संशयताला लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कुठलाही तपास होत नसल्याने पीडित कुटुंबियांनी आणि स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या खुनाच्या घटनेबाबत बाजूला राहणाऱ्या एका युवकावर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या हा युवक त्याच्या आईला घेऊन गायब असल्याने आणि त्याचा फोन देखील बंद येत असल्याने पोलीस या संशयिताच्या मागावर आहे. मात्र, त्याची कुठलीच माहिती मिळत नसल्याने पोलीस देखील सध्या हताश झाल्याचे दिसत आहे. 
खून प्रकरणातील संशयिताच्या वडिलांना म्हसरूळ पोलीस दररोज पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांनी आपली करडी नजर ठेवली आहे. तसेच, संशयित त्याच्या आईला घेऊन फरार झाला आहे. संशयितांची आई देखील वयस्कर असल्याने तिच्यावर कुठल्या रुग्णालयात उपचार सुरु आहे का या दिशेने देखील पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. यासाठी काही विशेष कर्मचारी प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला की, फरार झालेल्या संशयितांना पकडण्याचे काम स्थानिक गुन्हे शोध पथकाचे असते. सध्या गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. काही गुन्हेगार त्यांनी २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची किमया करून दाखवली आहे. मात्र, वयोवृद्ध महिला कुसुम एकबोटे यांचा खून होऊन तीन महिने उलटले आहे. तरी त्यांना संशयितांचा माग का मिळत नाही असा प्रश्न मयत एकबोटे यांच्या नातलगांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जातीने लक्ष घातल्यास संशयित नक्कीच मिळेल अशी आशा देखील नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. 

Translate »
error: Content is protected !!