रामनगरीची वाटचाल बिहारच्या दिशेने ?
युवकाच्या खुनाच्या घटनेने नाशिक हादरले !शहरात गुन्हेगारीने गाठला कळस ! पोलीस प्रशासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह !
नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येताना दिसत आहे. त्यातच पुन्हा एकदा दिवसाढवळ्या एका युवकाचा किरकोळ कारणावरून थेट निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरी, घरफोडी, जबरी लूट, खून, प्राणघातक हल्ले, सोनसाखळी चोरी यासारख्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहराची वाटचाल पूर्वी गुन्हेगारीत अव्वल असलेल्या बिहारच्या होताना दिसू लागल्याची चर्चा आता चौकाचौकात होऊ लागली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याचे दिसत असून, पोलीस कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

पूर्वी बिहारमध्ये बेरोजगारीमुळे दिवसाढवळ्या खून, प्राणघातक हल्ले, खंडणीसाठी अपहरण, बलात्कार, चोरी, घरफोडी, गोळीबार, अवैध दारू विक्री, अवैध धंदे यासाठी कुप्रसिद्ध होते. त्यात पोलीस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला बांधल्यासारखे असल्याने गुन्हे रोखण्यात त्यांना कायमच अपयश येताना संपूर्ण देशाने बघितले आहे. यातून बिहारची एक कुप्रसिद्ध ओळख निर्माण झाली होती. याचा इतिहास कोणालाही वेगळा सांगण्याची गरज नाही. मात्र, या ठिकाणी सत्तांतर झाल्यानंतर अनेक बदल होत गेले. अनेक कंपन्या बिहारमध्ये येत गेल्या आणि रोजगाराच्या संधी उपल्बध होत गेल्याने आणि पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्याशी इमाने इतबारे काम सुरु केल्याने गुन्हेगारी मोडीत काढण्यात मोठे यश आले होते. त्यामुळे सध्या बिहारने आपली असलेली एक चुकीची ओळख खोडून काढण्यात यश मिळविले आहे.
मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये पोलीस प्रशासन ढिम्म पडल्याने नाशिक शहरात गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. पोलीस गुन्हेगारी रोखण्याऐवजी सध्या टवाळखोरांवर खाकीचा धाक आजमावत आपला वेळ खर्ची घालताना दिसत आहे. अर्थात टवाळखोरांवर कारवाई करायलाच हवी. यात दुमत असायचे कारणच नाही. मात्र, त्यासाठी शहरातील वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणणे गरजेचे आहे. दिवसाढवळ्या किरकोळ वादातून भर रस्त्यात पोलिसांचा कुठलाही धाक न बाळगता थेट मुडदे पाडले जात आहे. आणि दुसरीकडे खून झाल्यानंतर संशयितांना पकडून आणल्याच्या प्रेसनोट तयार करून त्यातून बातम्या छापून घेत आपली पाठ थोपटवून घेण्याचे काम पोलीस प्रशासन करताना दिसत आहे. यातून शहरात जणूकाही कुठलीही गुन्हेगारी नसून रामराज्य असल्याचे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांचे नाव मात्र चांगलेच धुळीस मिळताना दिसत आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः रस्त्यावर उतरून गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून, नाशिककरांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे झाले आहे.
संशयित गणेश यादव लाखन, रोशन अशोक निसाळ, नागेश अशोक निसाळ, यादव लाखन, राजेंद्र लाखन यांचे दोन अनोळखी साथीदार यांनी शुक्रवार दि. ६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक नितीन शंकर शेट्टी, ३३, रा. आदिवासी सोसायटी, क्रांतीनगर, उंटवाडी रोड, नाशिक या युवकाच्या घराबाहेर येऊन त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. यावेळी नितीन शेट्टी हा घराबाहेर येताच या संशयितांनी त्याला घेरून खाली पाडले आणि त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. हल्ला इतक्या क्रूर पद्धतीने करण्यात आला होता की, मारेकऱ्यांनी धारदार शस्त्र, लोखंडी पहार, लोखंडी पट्टी आणि दगडाचा वापर करून नितीन याचा अक्षरशः ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. यावेळी नितीनचे कुटुंबीय आणि आजूबाजूचे नागरिक नितीनला सोडा म्हणून ओरडत होते. मात्र, हल्लेखोरांनी नितीनचा जागीच जीव जाईपर्यंत त्याला मारत राहिले आणि त्यानंतर सर्व संशयित घटनास्थळावरून फरार झाले. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात २६ तारखेला विशांत उर्फ काळू राजाराम भोये या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नितीन शेट्टी या युवकाच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. खुनाच्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





