सोनसाखळी चोराचा पोलिसांवर हल्ला ! - CHECKMATE NEWS
क्राईम

सोनसाखळी चोराचा पोलिसांवर हल्ला !


गोळीबार झाल्याची परिसरात चर्चा ; पोलीस म्हणतात असे काही घडलेच नाही !
नाशिक : पंचवटी परिसरात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारासह त्याच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. यावेळी पोलिसांना जखमी करून पळून जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. यामध्ये संशयित हा जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास चोर पोलिसांच्या या खेळात गोळीबार झाल्याची चर्चा रंगली असून, पोलिसांनी याबाबत असे काही घडले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहे. 
           याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोड वरील अश्वमेघ नगर परिसरात सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे हा कट्टा बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पथकाने रविवार दि. ८ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास किरण सोनवणे याच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. यावेळी किरणचा भाऊ रवींद्र सोनवणे याने पोलिसांशी तुम्ही येथे कसे आले असे बोलून हुज्जत घालत आपल्या कुटुंबियांना जमा करून घेतले. यावेळी जमलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला. यावेळी पोलीस अंमलदार राकेश कोष्टी याला जखमी करून किरण सोनवणे याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलीस पाठलाग करीत असताना किरण याचा पाय एका खड्ड्यात अडकला आणि तो खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.

            यावेळी किरण सोनवणे याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा आणि ५०० रुपये किंमतीचे एक काडतूस पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी संशयित किरण छगन सोनवणे, ३८, रा. प्लॉट नंबर १३, अश्वमेघ नगर, पेठ रोड पंचवटी नाशिक, अलका सोनवणे, रवींद्र सोनवणे, कुमार सोनवणे, सुनिता सोनवणे, वर्षा सोनवणे सर्व रा. अश्वमेघ नगर पेठरोड, पंचवटी, नाशिक यांच्याविरोधात पोलीस नाईक मिलिंद सिंग विजय सिंग परदेशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित गुन्हेगार किरण सोनवणे याच्यावर अनेक सोनसाखळी चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. विशेष म्हणजे या सोनवणे याचे कमाईचे दुसरे कुठलेही साधन नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, सोनवणे हा अश्वमेघ नगर परिसरातील एक टोलेजंग इमारतीचा मालक असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. हे संशयित परिसरात हे चांगल्या घरची लोक आहे असा नागरिकांचा समज होता. हा समज खोडून काढण्यासाठी आणि यांनी केलेले कारनामे नागरिकांना समजण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी मे २०१७ साली या सराईत गुन्हेगाराची त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात धिंड काढली होती. या संशयित किरण सोनवणे विरोधात शह, ग्रामीण भागासह नगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
रात्रीच्या सुमारास पोलीस आणि सोनसाखळी चोरामध्ये सुरू असलेल्या बाचाबाची मध्ये संशयिताने गोळीबार केल्याची चर्चा अश्वमेघ नगर, पवार मळा परिसरात रंगली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे याबाबत पोलिसांनी असे काहीही घडले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहे. 

Translate »
error: Content is protected !!