दिवसाढवळ्या भररस्त्यात युवकावर प्राणघातक हल्ला !
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह !
नाशिक : नाशिकमध्ये प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी गंगापूर रोड भागात एका युवकावर सिनेस्टाइल पद्धतीने भर रस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांऐवजी गुन्हेगारांचे वर्चस्व असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिक बाबासाहेब लांडगे, ३४, रा. गंगापूररोड, नाशिक हा युवक शुक्रवार दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील आपल्या घरी आईला सोडून बाहेर मित्रांसोबत गेला होता. दरम्यान मागील भांडणाची कुरापत काढून संशयित सोनू वाघ आणि त्याच्या मित्रांनी प्रतिक याला राठी आमराई परिसरात शिवीगाळ करीत मारहाण सुरु केली. यावेळी प्रतिक याने जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला दगड मारून जखमी करण्यात आले. दगड डोक्यात लागल्याने प्रतिक जमिनीवर कोसळला याचा फायदा घेत सोनू वाघ याने आपल्या जवळील तीक्ष्ण हत्याराने प्रतिक याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी जिवाच्या आकांताने प्रतिक पळत सुटला यावेळी रस्त्याने जाणाऱ्या काही सजग नागरिकांनी प्रतिक याला गंभीर जखमी अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित सोनू वाघ आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सध्या फरार झाले असून, सरकारवाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सिनेस्टाइल भर दुपारी आणी भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या गुन्हेगार अशा पद्धतीने प्राणघातक हल्ले करीत असल्याने पोलिसांविषयी नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.





