ऐन सणासुदीच्या काळात शहरात तडीपार गुंडांचे वास्तव्य !
विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० तडीपार गुंडाना अटक !
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार केलेले अनेक सराईत वास्तव्यास असल्याचे धक्कदायक वास्तव उघड झाले आहे. नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा तडीपार केलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या या संशयितांना कारागृहात पाठविण्यात आले आहे.
शहर परिसरात हाणामारी, चोरी, दरोडा, प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यातील संशयितांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, यातील बरेच तडीपार गुंड तडीपारीची मुदत संपण्याअगोदरच शहरात वास्तव्यास आले होते. याची चाहूल लागताच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या तडीपार गुंडाना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
यामध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित तडीपार गरुदेव बलदेव देवल उर्फ गोपी, २७, रा. चुंचाळे घरकुल, नाशिक, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित अनिल दत्तू पवार, ४१, रा. सुदर्शन कॉलनी,पंचवटी, नाशिक, आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख, २५, रा. नानावली मस्जिद जवळ, भद्रकाली, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित अरबाज उर्फ सोनू रफिक बेग, २५, पंचशीलनगर, नाशिक, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित अमन खालीद खान, १९, रा. म्हाडा कॉलनी, भारत नगर, विकार मोहंमद शेख, ३३, र. चौक मंडई, भद्रकाली, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित दर्शन मनोज डुगलज, २७, जुने मटण मार्केट, सातपूर गाव, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित केविन विवेक आसर, २२, रा. कॅनडा कॉर्नर, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित अमोल उर्फ नान्या किशोर फल्ले, २८, जुई नगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, सुजित उर्फ चंग्या भास्कर पगारे, ३०, रा. स्नेहनगर, म्हसरूळ या संशयितांना हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरतांना मिळून आला म्हणून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
शहरात वास्तव्यास असलेल्या या तडीपार गुंडाना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी आजमितीला अनेक तडीपार गावगुंड शहरात राजकीय वरदहस्त असल्याने मोकाट फिरत आहे. अशा मुजोर गुंडांच्या देखील मुसक्या पोलिसांनी वेळीच आवळाव्या अशी मागणी सामान्य नाशिककरांकडून करण्यात येत आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले असून, काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार असल्याने या गुंडाना मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच या तडीपार गुंडांविरोधात अजून कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबणे गरजेचे असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.





