बेपत्ता महिलेच्या खुनाने पंचवटी परिसरात खळबळ !
पंचवटी परिसरात खुनाची मालिका सुरु ; परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु !
नाशिक : पंचवटी परिसरात पुन्हा एकदा खुनाची मालिका सुरु झाली आहे. आडगाव शिवारात दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीकडे जास्त जातो का कारणावरून नवऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हिरावाडी परिसरात एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला घटनास्थळी मारले की, महिलेचा खून करून या हिरावाडी परिसरातील जेम्स स्कुल समोरील मोकळया मैदानात आणून टाकले याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने खून का करण्यात आला असावा याबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. १९ रोजी पोलिसांना खबर मिळाली की, हिरावाडी परिसरातील जेम्स स्कुल समोरील मोकळ्या मैदानात एक महिला मृतावस्थेत मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेत पाहणी केली असता, याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या भारती माणिक वाळटे, ५६, रा. कमल नगर हिरावाडी यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पाहणी केली असता भारती यांच्या उजव्या डोळ्यावर जखम झालेली असून, त्यांच्या गळ्याभोवती काळसर आणि निळसर व्रण दिसून आले आहे. त्यामुळे भारती यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच, घटनास्थळी भारती यांच्याशी काही झटापट झाल्याबाबत काहीही आढळून आलेले नाही. त्यामुळे भारती यांचा खून करून घटनास्थळी आणून टाकले का असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून, त्यादिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
भारती वाळटे या शनिवार दि. १८ रोजी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली होती. तसेच, सोशल मीडियावर देखील बेपत्ता असल्याबाबत मॅसेज व्हायरल केले होते. तसेच, भारती यांचे काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भारती वाळटे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला. त्याठिकाणी पोलिसांना भारती यांच्या अंगावरील दागिने आणि पायातील चप्पल देखील व्यवस्थित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेमका भारती यांचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहे. यासाठी पंचवटी पोलीस संपूर्ण हिरावाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास नेमका काय प्रकार घडला हे समोर येणार असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.





