सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास !
नऊ वर्षे सतत लैंगिक अत्याचार ; जन्मदात्रीही झाली होती फितूर !
नाशिक : (विशेष प्रतिनिधी) अल्पवयीन सावत्र मुलीसोबत सतत नऊ वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास नाशिकच्या न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या पतीकडून भविष्यात होणारे आर्थिक लाभ लक्षात घेऊन पिडीतेची जन्मदात्री फितूर झाली होती. परंतु सरकारी वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने आरोपीला शिक्षा होण्यास मोठी मदत झाली.
जिल्हा सत्र न्यायाधीश वैशाली मालंकपट्टे रेड्डी यांनी हा निकाल दिला आहे. सरकारतर्फे अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी पुरावा सादर करत युक्तिवाद केला. सुनील टिप्पा पंथीकर (रा. फ्लॅट क्रमांक ४ बी, बजरंग सोसायटी, टागोर नगर, नाशिक-पुणे रोड) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, पिडीत बालिका ही आरोपीची सावत्र मुलगी आहे. सन २००९ मध्ये पिडीत मुलगी ही इयत्ता पाचवीमध्ये असताना वेळोवेळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सुनील पंथीकर लैंगिक अत्याचार करत राहिला. जुलै २०१८ मध्ये हे अत्याचार असह्य झाल्याने पिडीतेने उपनगर पोलिसांकडे धाव घेऊन आपली कैफीयत मांडली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत बालिकेच्या आईने आरोपी पतीकडून होणारे आर्थिक लाभ लक्षात घेऊन पिडीता हिचे अनेक मित्र असून त्यांच्याकडून पिडीतेने मोबाईल भेट घेतल्याचे सांगितले. परंतू पिडीतेने धाडसाने हे आरोप खोटे असल्याचे नमूद केले. पिडीत बालिकेची जन्मदात्री फितूर झाल्याचे सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व पुराव्यांनुसार न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.





