वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला !
संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात !
नाशिक : बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकांमध्ये झालेले वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली आहे.या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार (दि. २) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ चुंचाळे शिवारात असलेल्या गट न. ३१/२ गाडे मळा याठिकाणी बांधकाम व्यावसायिक (विकासक) आणि जागा मालक यांच्यामध्ये बांधकामावरून वाद सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच महिला पोलीस पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना दिली. यावेळी पवार यांनी नियंत्रण कक्ष येथील राखीव पोलीस फोर्स घेवुन घटना स्थळ गाठले. बांधकाम व्यावसायिक माणिक सोनवणे यांना याबाबत विचारले असता सदर जागेच्या मालकी हक्का बाबत गाडे यांच्यासोबत वाद असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच, न्यायालयच्या आदेशाने मनपा प्रशासनाला पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आदेशीत केले असल्याची माहिती दिली.
यावेळी गाळा मालक सचिन प्रकाश जाणी व मनपाचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी आले. त्यावेळी त्यांनी तेथे हजर असलेल्या बेबी कैलास गाडे या महिलेला सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणच्या गाळयात लाईट फिटींग व प्लंबिगचे काम करण्यासाठी आदेश दिला आहे. तरी तुम्ही या मध्ये अडथळा आणु नये असे समजावून सांगितले. साधारण सकाळी बारा वाजेच्या सुमारास मनपा अधिकाऱ्यांनी गाळे उघडण्या कामगारांना सांगताच संशयित बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांनी थेट हल्ला करत मजुरांना मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी हा वाद मोटविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी मध्यस्थी केली असता त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला करण्यात आला. तसेच, पोलीस उपनिरीक्षक उंडे यांच्या समवेत असलेले झनकसिंग घुणावत, मनोहर चौधरी, उमाकांत टिळेकर, सचिन कारजे, योगेश शिरसाठ, घनश्याम भोये, अनिल गाडवे, सुधीर आव्हाड, पाचोरे, महिला पोलीस अश्विनी पवार यांना देखील मारहाण करीत चावा घेऊन जखमी करण्यात आले.
यावेळी अंबड पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांच्या फिर्यादीवरून संशयित बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांना ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेल्या संशयितांसह अन्य ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.





